राजकोट - मालिका जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंड संघाने 40 धावांनी भारताचा पराभव करत पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढला. न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली होती. कोलिन मुन्रो याने तुफानी खेळी करत 55 चेंडूत शतक पुर्ण केलं. भारतीय गोलंदाज या सामन्यात हवी तशी कामगिरी करु शकले नाहीत. न्यूझीलंडने फक्त दोन विकेट गमावत भारतासमोर विजयासाठी 197 धावांचं आव्हन ठेवंल होतं. मात्र भारत हे आव्हान पुर्ण करु शकला नाही आणि पराभव झाला.
197 धावा भारत सहज करु शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण रोहित शर्मा, शिखर धवन, हार्दिक पंड्या स्वस्तात बाद झाल्याने भारतासमोरील आव्हान अवघड होत गेले. श्रेयस अय्यरने ताबडतोब फलंदाजी केली. मात्र 23 धावांवर झेल देऊन तो आऊट झाला. हार्दिक पंड्या तर फक्त एकच धाव करु शकला. स्टम्पवर आलेला बॉल त्याला कळलाच नाही आणि बोल्ड झाला. विराट कोहली आणि धोनीने चाहत्यांच्या अपेक्षा कायम ठेवल्या होत्या. पण विराट कोहली 75 धावांवर झेलबाद झाला. धोनीने काही शॉट्स लगावले, पण कोहलीला स्ट्राईक देण्याच्या नादात त्याने काही चेंडू वाया घालवले. 49 धावांवर धोनी आऊट झाला.
तीन सामन्यांच्या मालिकेत भारत आणि न्यूझीलंडने 1-1 ने बरोबरी साधली आहे. मालिकेतील तिसरा व अंतिम सामना ७ नोव्हेंबर रोजी त्रिवेंद्रम येथे खेळविला जाईल. अंतिम सामना जिंकणार संघ मालिका जिंकेल.
दरम्यान राजकोटच्या मैदानावर झालेला हा दुसरा टी-२० सामना होता. आयपीएलच्या गुजरात लायन्सचे हे गृहमैदान असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१३ मध्ये भारताने विजय मिळविला होता. २०१३ आणि २०१५ साली येथे दोन वन डेचे आयोजन झाले. इंग्लंड आणि द. आफ्रिकेविरुद्ध भारत पराभूत झाला. कसोटीचा दर्जा मिळताच भारत- इंग्लंड यांच्यात येथे पहिली कसोटी खेळविण्यात आली होती.
Web Title: Second T20 match - New Zealand won the toss and decided to bat
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.