कोलंबो : शानदार फॉर्ममध्ये असलेल्या भारताला आज गुरुवारपासून सुरू होत असलेली दुसरी कसोटी जिंकून लंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी आहे. या लढतीत सलामीवीराच्या भूमिकेत लोकेश राहुलच्या जोडीला कोण, याविषयी अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही.
पहिल्या सामन्याआधी ‘व्हायरल’मुळे राहुल खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत शिखर धवन-अभिनव मुकुंद यांनी सलामीवीरांची भूमिका निभावली. भारताने हा सामना ३०४ धावांनी सहज जिंकला. राहुल आजारातून सावरला असून फिटनेस टेस्ट उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे दुसºया सलामीवीरासाठी धवन-मुकुंद यांच्यात चुरस आहे. धवनने गाले येथे पाचवे कसोटी शतक साजरे करताना १९० धावा ठोकल्या होत्या. मुकुंदने दुसºया डावात अर्धशतक नोंदविले होते. राहुल बरा झाल्याने मुकुंदला राखीव बाकावर बसावे लागेल, असे दिसते. मागच्या दौºयातही भारताला येथे सलामी जोडीचा प्रश्न पडला होता. त्या वेळी धवन आणि मुरली विजय बाहेर राहिल्याने राहुलने चेतेश्वर पुजाराच्या सोबतीने डावाला सुरुवात केली होती.
भारत कसोटी क्रमवारीत अव्वल तर श्रीलंका सातव्या स्थानावर आहे. गाले कसोटीच्या वेळी ही बाब सिद्ध झाली. दुसºया सामन्यात भारताच्या कडव्या आव्हानाला यजमान संघ कसा सामोरा जातो, हे पहिल्या दोन दिवसांच्या खेळात निश्चित होणार आहे. वर्षभराआधी श्रीलंकेने आॅस्ट्रेलियाला ३-० ने नमविले होते; पण आता परिस्थिती बदलली. त्या वेळी खेळपट्ट्या वेगळ्या होत्या शिवाय लंकेचा मारा अधिक भेदक होता.
यजमान संघासाठी शुभवार्ता अशी की कर्णधार दिनेश चांदीमल न्यूमोनियातून सावरला आहे. तो उद्या खेळेल. २०१५मध्ये गाले कसोटीत भारताविरुद्ध १६९ चेंडूंत १६२ धावा ठोकणाºया चांदीमलकडून कामगिरीची पुनरावृत्ती होईल, अशी लंकेला आशा आहे. जखमी असलेल्या गुणरत्नेचे स्थान फलंदाज लाहिरु तिरिमाने याने घेतले. पहिल्या सामन्यात गुणरत्नेच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. तो संपूर्ण मालिकेत खेळणार नाही.
तिरिमाने २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध अखेरचीकसोटी खेळला. भारताविरुद्ध सराव सामन्यात त्याने ५९ धावा काढल्या आहेत. डावखुरा फिरकी गोलंदाज लक्षण संदाकण याला रंगना हेरथऐवजी स्थान देण्यात आले. हेरथला पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापत झाली होती.
या मैदानावर दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. भारताने २०१५ मध्ये ११७ धावांनी विजय नोंदविला. हिरव्यागार खेळपट्टीवर पुजाराने नाबाद १४५ धावा ठोकल्या होत्या. तेव्हापासून तो तिसºया स्थानावर खेळत आहे. ही त्याची ५० वी कसोटी असेल.
राहुलचे धडाक्यात पुनरागमन होईल : कोहली
व्हायरलमुळे पहिल्या कसोटीस मुकलेला लोकेश राहुल दुसºया सामन्यात धडाकेबाज पुनरागमन करेल, असा विश्वास कर्णधार विराट कोहली याने सामन्याच्या पूर्वसंध्येला व्यक्त केला.
कोहली म्हणाला, ‘राहुल नियमित सलामीवीर आहे. त्यामुळे धवन अथवा मुकुंद यापैकी एकाला बाहेर बसावे लागेल. राहुलने गेली दोन वर्षे सातत्यपूर्ण कामगिरी केली असल्याने तो पुनरागमनाचा हकदार आहे. माझ्या मते, राहुल अंतिम एकादशमध्ये असेल. तो धडाकेबाज फलंदाजी करेल, असा मला विश्वास आहे.’
धवन किंवा मुकंद यापैकी कुणाला बाहेर बसावे लागेल, असे विचारताच मुकुंदला बाहेर राहावे लागेल, असे कोहलीने संकेत दिले. आम्ही सर्वोत्कृष्ट संयोजनासह उतरणार असून, खेळाडू व्यावसाायिक असल्याने संघाच्या हितावह निर्णय घेतले जातात, हे त्यांना माहिती असल्याचे कोहलीने एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
२०१५ च्या कामगिरीची पुनरावृत्ती करायचीय : चांदीमल
कोलंबो : फिट होऊन संघात परतलेला श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चांदीमल याने भारताविरुद्ध २०१५ च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा निर्धार व्यक्त केला. गाले येथे दोन वर्षांआधी चांदीमलने ठोकलेल्या शतकामुळे लंकेला माघारल्यानंतरही मुसंडी मारण्यात यश आले होते. दुसºया कसोटीच्या पूर्वसंध्येला तो म्हणाला, ‘माझी ती उत्कृष्ट खेळी होती. माझ्या खेळीच्या बळावर लंकेचा विजय साकार झाला होता. दोन वर्षांआधीच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक असून, भारताच्या फिरकीपटूंचा सामना करण्यास सज्ज आहे.’
दुसºया सामन्यादरम्यान श्वसनाचा त्रास होऊ नये म्हणून चांदीमलला आयसीसीने ‘इन्हेलर’ वापरण्याची परवानगी दिली. भारताला ३-० ने विजय मिळू नये यासाठी सामना जिंकून बरोबरी साधण्याच्या निर्धारानेच मैदानावर उतरणार असल्याचे चांदीमलने सांगितले.
लंकेचे सामने आता पाहत नाही : रणतुंगा
श्रीलंका क्रिकेट व्यवस्थापनावर नाराज असलेला माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा याने राष्टÑीय क्रिकेट संघाचे सामने पाहणेदेखील सोडून दिले आहे. रणतुंगाच्या नेतृत्वात १९९६ मध्ये लंकेने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता.
‘सिलोन टुडे’शी बोलताना रणतुंगा म्हणाला, ‘श्रीलंका क्रिकेटच्या खराब व्यवस्थापनामुळे राष्टÑीय संघाची दुर्दशा झाली. सध्या भारताविरुद्धच्या मालिकेतही सामने पाहण्याची इच्छा होत नाही.’ क्रिकेटपटू आणि प्रशासक देशासाठी समर्पित राहण्याऐवजी स्वत:ची कमाई तसेच विदेश दौºयाबाबत चिंतित असतात, असे ५२ वर्षांच्या रणतुंगाचे मत आहे. श्रीलंकेच्या खेळाडूंचा खेळ पाहावा, अशी कामगिरी त्यांच्याकडून होताना दिसत नाही.’
(वृत्तसंस्था)
उभय संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन , लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, रिद्धिमान साहा, ईशांत शर्मा, उमेश यादव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, अभिनव मुकुंद.
श्रीलंका : दिनेश चांदीमल (कर्णधार), अँजेलो मॅथ्यूज, उपुल थरंगा, दिमुथ करुणारत्ने, निरोशन डिकवेला, कुशाल मेंडिस, धनंजय डिसिल्व्हा, धनुष्का गुणतिलका, लाहिरू कुमारा, विश्वा फर्नांडो, नुवान प्रदीप, रंगना हेरथ, दिलरूवान परेरा, मलिंडा पुष्पकुमारा, लक्षण संदाकन, लाहिरू तिरिमाने.
Web Title: The second test against Lanka today: India has the chance to win the series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.