नॉर्थ पॉईंट : कर्णधार क्रेग ब्रेथवेट व माजी कर्णधार जेसन होल्डर यांच्या वैयक्तिक अर्धशतकांच्या बळावर वेस्ट इंडिजने दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेपुढे चौथ्या दिवशी ३७७ धावांचे आव्हान ठेवले.पहिल्या डावात १२६ धावांची खेळी करणाऱ्या ब्रेथवेटचे दुसऱ्या डावात शतक हुकले. तो ८५ धावा काढून बाद झाला. याव्यतिरिक्त काइल मायर्सने ५५ व होल्डरने नाबाद ७१ धावांचे योगदान दिले. त्यामुळे वेस्ट इंडिजने दुसरा डाव ४ बाद २८० धावसंख्येवर घोषित केला.श्रीलंकेने वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावातील ३५४ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना २५८ धावा केल्या. त्यांनी दुसऱ्या डावात ९ षटकांत बिनबाद २९ धावा केल्या होत्या. त्यांना विजयासाठी अद्याप ३४८ धावांची गरज असून, त्यांच्या सर्व १० विकेट शिल्लक आहेत. दिवसअखेर ११ धावा काढून नाबाद असलेल्या दिमुथ करुणारत्नेला लाहिरू थिरिमाने १७ धावा काढून साथ देत होता.त्याआधी सकाळच्या सत्रात पहिल्या डावातील ८ बाद २५० या धावसंख्येवरून पुढे खेळताना श्रीलंकेचा पहिला डाव २५८ धावांत संपुष्टात आला. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात ९६ धावांची आघाडी घेतली.पामुथ निसांका ५१ धावा काढून बाद झाला. त्याला बाद करणाऱ्या केमार रोचने त्यानंतर विश्व फर्नांडो यालाही तंबूचा मार्ग दाखविला.वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात जॉन कॅम्पबेल (१०) व जरमाईन ब्लॅकवुड (१८) यांना झटपट गमावले. ब्रेथवेटने त्यानंतर मायर्ससोबत ८२ व होल्डरसोबत ८७ धावांची भागीदारी केली. होल्डरने डाव घोषित करण्यापूर्वी यष्टिरक्षक फलंदाज जोशुआ डी सिल्वा (नाबाद २०) याच्यासोबत ५३ धावांची भागीदारी केली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- दुसरी कसोटी : विंडीजचे श्रीलंकेपुढे ३७७ धावांचे लक्ष्य
दुसरी कसोटी : विंडीजचे श्रीलंकेपुढे ३७७ धावांचे लक्ष्य
कर्णधार क्रेग ब्रेथवेट व माजी कर्णधार जेसन होल्डर यांच्या वैयक्तिक अर्धशतकांच्या बळावर वेस्ट इंडिजने दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेपुढे चौथ्या दिवशी ३७७ धावांचे आव्हान ठेवले.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 4:58 AM