मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनला (MCA) लवकरच नवा अध्यक्ष मिळणार आहे. एमसीएचे दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनानंतर मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी काँग्रेस नेते भूषण पाटील यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने सचिव अजिंक्य नाईक आणि उपाध्यक्ष संजय नाईक यांच्यात थेट लढत होणार आहे. २३ जुलै रोजी वानखेडे स्टेडियमवर मतदान प्रक्रिया पार पडेल. या आधी अजिंक्य नाईक यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनला एक युवा अध्यक्ष मिळावा यासाठी मला संधी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षपदासाठी होत असलेली निवडणूक मेरिटवर लढवली जाईल. एमसीएचे दिवंगत अध्यक्ष अमोल काळे हे माझे अत्यंत जिवलग मित्र होते. म्हणूनच येऊ घातलेली ही निवडणूक आनंदाची नसून दु:खाची आहे. मुंबईला क्रिकेटचा लाभलेला हा इतिहास पुढे नेण्यासाठी आम्ही काम करू. यापूर्वीच मुंबईतील रणजी करंकड खेळणाऱ्या शिलेदारांना देखील मुंबई क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआय प्रमाणे मानधन सुरू केले आहे. असे करणारे मुंबई क्रिकेट असोसिएशन हे देशातील पहिले असोसिएशन आहे, असे अध्यक्षपदाचे उमेदवार अजिंक्य नाईक यांनी सांगितले.
"आनंदाची नसून दुःखाची निवडणूक"
तसेच दिवंगत अमोल काळे यांनी आखलेल्या योजनांवर काम करण्यासाठी आम्ही सतत कार्यरत राहू. एमसीएची परंपरा कायम राहील याची मी खात्री देतो. मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे सर्व कामे मार्गी लावण्यात आम्हाला यश आले. १० जून रोजी घडलेली घटना सर्वांसाठी दु:खदायक आहे. पण, सर्वांच्या आग्रहास्तव मी निवडणूक लढत आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींनी आम्हाला दिलेला सल्ला, त्यांनी सुचवलेले पर्याय यामध्ये आम्ही वेळोवेळी लक्ष घातले आहे, असेही अजिंक्य नाईक यांनी नमूद केले.
अजिंक्य नाईक यांनी आणखी सांगितले की, क्रिकेटसाठी कोण काम करत आहे हे लोकांना समजत आहे. मेरिटवर निवडणूक होईल. क्लब सेक्रेटरी, क्रिकेटर्स आणि इतर सदस्य क्रिकेटसाठी काम करणाऱ्याची निवड करतील असा मला विश्वास आहे. दिवंगत अमोल काळे यांनी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. क्रिकेटसाठी जे काही चांगले करता येईल ते ते करण्यावर आमचा भर असेल. मग त्यामध्ये क्युरेटर असो की मग क्रिकेटर्स... सर्वांसाठी मी काम करेन. आगामी काळातही मुंबई क्रिकेट असोसिएशन इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करेल. तसेच मुंबईपासून २६ किमी अंतरावर असलेल्या आमने येथे नवीन स्टेडियमच्या उभारणीसाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडे टेंडर भरण्यात आले आहे. त्याची प्रक्रिया सुरू असून, अंधेरीत महापालिकेच्या जागेसाठी देखील टेंडर भरण्यात आले आहे.
दरम्यान, दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनामुळे ही निवडणूक होत आहे. ट्वेंटी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १० जून रोजी काळे यांचे निधन झाले. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे रिक्त असलेल्या एमसीएच्या अध्यक्षपदासाठी अजिंक्य नाईक आणि संजय नाईक यांच्यात लढत होत आहे.