चक्रीवादळात अडकलेली टीम इंडिया भारतात येण्यासाठी निघाली आहे. तीन दिवसांच्या वातावरण निवळण्याची हॉटेलमध्ये वाट पाहिल्यानंतर टीम इंडियाचे विमान उद्या सकाळी दिल्लीत उतरणार आहे. अशातच रोहित शर्माने प्रवासात असतना ट्विट करून मोठी घोषणा केली आहे.
आम्हाला तुमच्यासोबत ह्या खास क्षणाचा आनंद साजरा करायचा आहे. ४ जुलैला सायंकाळी ५ वाजल्यापासून मरीन ड्राईव्हवर विजय यात्रा आणि वानखेडेवर महोत्सव साजरा केला जाणार आहे. विश्वचषक घरी येतोय, अशी पोस्ट मुंबईकर रोहितने एक्स अकाऊंटवर पोस्ट केली आहे.
वर्ल्डकपच्या सेलिब्रेशनसाठी टीम इंडिया मुंबईत येणार आहे. यामुळे हा वर्ल्डकप पाहण्यासाठी मुंबईत चाहत्यांची मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांकडेही फार कमी वेळ हातात असून या चाहत्यांना आवरण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात करावा लागणार आहे.
एअर इंडियाचे AIC24WC विमान भारताकडे यायला निघाले आहे. उद्या सकाळपर्यंत भारतीय संघ दिल्लीत पोहोचणार आहे. तीन दिवसांपासून बारबाडोसच्या आकाशात चक्रीवादळ घोंघावत होते. यामुळे तेथील विमानतळ बंद करण्यात आले होते. बुधवारी सकाळी टीम इंडिया भारतात येईल अशी बातमी आली होती. परंतू, धोका टळला नसल्याने एक दिवसाचा विलंब झाला होता.