IND vs SA 3rd ODI Live Updates: आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात २८७ धावा केल्या. अनुभवी क्विंटन डी कॉकची १२४ धावांची खेळी आणि वॅन डर डुसेनने (५२) त्याला दिलेली साथ याच्या जोरावर यजमानांनी मोठी धावसंख्या उभारली. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला भारताचा कर्णधार केएल राहुल स्वस्तात बाद झाला. पण शिखर धवनने विराटच्या साथीने डाव पुढे नेला. धवन अर्धशतकानंतर बाद झाला. पाठोपाठ ऋषभ पंतही शून्यावर बाद झाला. पण विराटने झुंज सुरू ठेवत अर्धशतक झळकावले. त्याचे आजचे अर्धशतक खूपच खास ठरले.
आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा रनमशिन विराट कोहली फॉर्ममध्ये परतला आणि त्याने दमदार अर्धशतक झळकावले. विराटने ६३ चेंडूंमध्ये अर्धशतक साजरं केलं. या अर्धशतकानंतर विराट कोहलीने स्टेडियममध्ये असलेल्या आपल्या पत्नीला आणि लेकीला एक लूक दिला. हातातली बॅट बाळासारखी झुलवत त्याने आपलं अर्धशतक साजरं केलं. तर, अनुष्काही, 'ते बघ बाबा...', असं आपली लेक वामिकाला सांगताना दिसली. विराट अनुष्काचा हा व्हिडीओ अवघ्या काही सेकंदातच तुफान व्हायरल झाला. चाहत्यांना एकाच दिवशी दोन-तीन वेळा वामिकाची झलक पाहायला मिळाली. वामिका खूपच 'क्युट' असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिसून आल्या.
--
--
त्याआधी दक्षिण आफ्रिकेने ५० षटकात २८७ धावांपर्यंत मजल मारली. मालिकेत पहिल्यांदाच संधी मिळालेल्या दीपक चहरने सलामीवीर यानामन मलानला स्वस्तात माघारी धाडलं. त्यानंतर केएल राहुलनेही बावुमाला धावचीत केलं. पाठोपाठ एडन मार्करमही १५ धावांवर तंबूत परतला. आफ्रिकेचा डाव कोलमडणार असं वाटत असतानाच डी कॉक आणि डुसेन जोडीने १४४ धावांची भागीदारी केली. दोघांनी फटकेबाजी करत संघाला चांगली धावसंख्या गाठून दिली. हे दोघे बाद झाल्यानंतर तळाच्या फलंदाजांनी छोट्या मोठ्या भागीदारी करून संघाला २८७ धावांपर्यंत मजल मारून दिली. भारताकडून नव्याने संधी मिळालेल्या प्रसिध कृष्णाने ३ तर दीपक चहरने २ बळी टिपले.
Web Title: See your Dad Anushka Sharma tells Daughter Vamika after Virat Kohli scores Fifty does special Celebration Watch Video IND vs SA 3rd ODI Live Updates
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.