नवी दिल्ली : वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी भारताला बऱ्याचदा दमदार सलामी दिली. त्यांच्यावर त्यावेळी स्तुतीसुमनांचा वर्षावही झाला. पण सध्याच्या घडीला ते टीकेचे धनी ठरत आहेत. दिल्ली क्रिकेट असोसिशनच्या क्रिकेट समितीमध्ये त्यांची निवड बुधवारी झाली होती. या निवडीच्या फक्त एका दिवसामध्येच त्यांच्यावर टीका व्हायला सुरुवात झाली आहे.
दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी बुधवारी संघटनेच्या क्रिकेट समितीची घोषणा केली होती. या समितीमध्ये सेहवाग, आकाश चोप्रा, राहुल संघवी यांचा समावेश आहे. त्याचबरोबर या समितीमध्ये निमंत्रक म्हणून गंभीरचा समावेश करण्याता आला आहे.
क्रिकेट समिती ही दिल्लीच्या निवड समितीची निवड करू शकते. पण गंभीर अजूनही क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे तो ज्या संघाचा खेळाडू असेल त्या संघाची निवड समिती स्थापन करण्याचा अधिकार गंभीरला कसा देण्यात येऊ शकतो, हा प्रश्न विचारला जात आहे. रजत शर्मा यांच्या वाहिनीवर सेहवाग हा क्रिकेट समीक्षक म्हणून कार्यरत होता, त्यामुळे त्याची निवड या समितीमध्ये केली असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर आकाश चोप्रा हा समालोचन करतो, त्याचबरोबर राहुल संघवी हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाशी संलग्न आहे. या समितील सदस्य परस्पर हितसंबंध जपत असल्याचे म्हटले जात असल्यामुळे त्यांच्यावर टीका होत असल्याचे समोर येत आहे.