मुल्तानचा सुल्तान आणि टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागलाआयसीसीकडून गौरविण्यात आले आहे. आयसीसीने हॉल ऑफ फेममध्ये सेहवागच्या नावाचा समावेश केला आहे. सेहवागसह भारतीय महिला संघाची माजी फलंदाज डायना एडुल्जी यांनाही हा सन्मान देण्यात आला आहे. आयसीसीकडून तीन जणांना हा विशेष सन्मान देण्यात आला असून श्रीलंकेच्या अरविंद डिसल्वाचाही यात समावेश आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने या सन्मानाबद्दल तिन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले असून सेहवागला खास हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
विरेंद्र सेहवाग आणि डायना एडुल्जी यांच्याअगोदर ७ भारतीय खेळाडूंना हा सन्मान देण्यात आला आहे. त्यात सचिन तेंडुलकरला २०१९ मध्ये हा बहुमान मिळाला. राहुल द्रविड, अनिल कुंबळे, सुनिल गावस्कर, बिशनसिंह बेदी, विनू माकंड आणि कपिल देव यांचा या क्लबमध्ये सहभाग आहे. सेहवागने या सन्मानाबद्दल आयसीसीचे आभार मानले आहे. तसेच, माझ्यासाठी सदैव शुभेच्छा देणाऱ्या प्रार्थना करणाऱ्या माझ्या चाहत्यांना, मित्रांना आणि सहकारी खेळाडूंनाही धन्यवाद देतो, असे सेहवागने या सन्मानाबद्दल बोलताना म्हटले आहे.
दरम्यान, सचिन तेंडुलकरने या सन्मानाबद्दल तिन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले. त्यात, सेहवागचे विशेष अभिनंदन केले आहे. सन्मानपात्र तीन खेळाडू हे खूप वेगळे असून वेगवेगळ्या कालखंडात क्रिकेट खेळलेले आहेत. या तिघांनी आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवले ही आनंदाची बाब आहे. ज्येष्ठ क्रिकेटपटू डायना एडुलजी, ज्या भारतातील आघाडीच्या महिला क्रिकेटपटूंपैकी एक होत्या. तर, श्रीलंकेला ‘९६ च्या विश्वचषक’ जिंकून देण्यात अरविंद डिसल्वाची मोलाची भूमिका राहिली आहे. आणि अर्थातच, माझा मित्र आणि गुन्ह्यातील भागीदार विरेंद्र सेहवाग.. असे म्हणत सचिनने सेहवागचं खास अभिनंदन केलं. तसेच, विरुने कसोटी सलामीवीर म्हणून फलंदाजीची पूनर्रचनाच केली आणि गो या शब्दापासून सर्वच गोलंदाजांवर आक्रमण करण्यास सुरुवात केली, असे ट्विट सचिनने केले आहे.
दरम्यान, विरेंद्र सेहवाग हा २०११ च्या विश्वविजयी भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज होता. आपल्या फलंदाजीने त्याने प्रसिद्ध जलदगती गोलंदाजांच्याही मनात भीती निर्माण केली होती. आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये त्याने टीम इंडियासाठी मोलाची भूमिका बजावली. तर, अनेक सामन्यात सेहवागच्या तुफानी फलंदाजीमुळे भारताला विजय मिळाला आहे. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांमध्ये सेहवागचं नाव घेतलं जातं.
सेहवागने कसोटी सामन्यांतही जोरदार प्रदर्शन केलं आहे. कसोटी सामन्यात मुल्तानच्या मैदानावर पाकिस्ताविरुद्ध त्रिशतकाचा विक्रमही सेहवागने केला. कसोटी क्रिकेटमध्ये १०४ सामन्यात सेहवागने ८५८६ धावा केल्या आहेत. त्यामध्ये, २३ शतक आणि ३२ अर्धशतकांचा समावेश आहे. तर, टीम इंडियासाठी २५१ एकदिवसीय सामन्यांत ८२७३ धावा केल्या आहेत. त्यामध्ये, १५ शतक आणि ३८ अर्धशतकांचा ठोकले आहेत.
महिला गोलंदाज
डायना एडुल्जी यांनी आयसीसीने हॉल ऑफ फेमच्या क्लबमध्ये सामिल केलं आहे. हा सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय महिला क्रिकेटर आहेत. डायना यांनी भारताकडून एकूण २० कसोटी आणि ३४ एकदिवसीय सामन्यांत खेळ केला आहे. त्यात, अनुक्रमे कसोटी सामन्यात ६३ आणि एकदिवसीय सामन्यात ४६ धावा केल्या आहेत.