अहमदाबाद : कोलकाता नाईट रायडर्सने सोमवारी (दि. २६) पंजाब किंग्जविरुद्धचा सामना ५ गड्यांनी जिंकला. मात्र, या सामन्यात कोलकाताच्या संघाने एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधले. कोलकाताच्या डगआऊटमधून खेळाडूंना इशारे आणि सूचना देण्यासाठी कोड वर्डसचा वापर केला गेला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असा प्रकार झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यावर भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यानेही तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्याने केकेआरवर टीका केली.
‘‘असे कोड मेसेजेस लष्करातील जवानांसाठी असतात, हे आपण पाहिलं किंवा ऐकले आहे. कोलकाताने डगआऊटमधून केलेला ५४ क्रमांकाचा इशारा माझ्या मते एका गोलंदाजाला ठरावीक वेळेला गोलंदाजी करण्यासाठी केलेला असावा. यामुळे कदाचित कर्णधार इयॉन मॉर्गनला मदत मिळू शकली असेल; पण मैदानाबाहेरूनच सामना नियंत्रित केला जाणार असेल, तर मैदानात कोणताही खेळाडू कर्णधार बनू शकतो. कर्णधाराची कोणतीच भूमिका शिल्लक राहत नाही. मॉर्गनकडे प्रचंड क्षमता असून तो विश्वविजेता कर्णधार आहे.’ -वीरेंद्र सेहवाग