देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेच्या रणजी हंगामाला सुरुवात झाली आहे. मुंबई संघाचा पहिला सामना मध्य प्रदेशविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे उपलब्ध नाही. अजिंक्यनं तसे निवड समितीला कळवलं आहे. मात्र अजिंक्यच्या या निर्णयामुळे निवड समितीच्या सदस्यांनी चांगलंच आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्याच्या निर्णयामुळे निवड समिती चांगलीच नाराज झाली असून, त्याच्यासारख्या खेळाडूकडून अशा वर्तनाची अपेक्षा नसल्याचा सूर निवड समितीच्या बैठकीत उमटला होता. निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर याच्या अध्यक्षतेखाली संघाची घोषणा करण्यात आली. यावेळी अजिंक्यने रणजी सामन्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचं सांगितलं. अजिंक्य सध्या आपल्या पत्नीसोबत सेशेल्समध्ये सुट्टीवर आहे.
रणजी चषक स्पर्धेसाठी बलाढ्य मुंबई संघ सज्ज झाला असून कर्णधार आदित्य तरेच्या नेतृत्त्वाखालील संघाची सोमवारी घोषणा करण्यात आली. गतमोसमाचे उपविजेते असलेल्या मुंबईच्या उपकर्णधारपदी अनुभवी सुर्यकुमार यादवची निवड करण्यात आली असून युवा पृथ्वी शॉ सध्या भारत ‘अ’ संघाकडून खेळत असल्याने त्याचा सध्या मुंबई संघासाठी विचार झालेला नाही.
रहाणे सध्या पत्नी राधिकाबरोबर सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी परदेशात गेला आहे. अजिंक्य राहणे हा सेशेल्स या देशात आहे. रहाणे या सामन्यासाठी उपलब्ध नसल्यामुळे मुंबई रणजी संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मुंबई रणजी संघ यावर्षीच्या स्पर्धेकडे 42 वे विजेतेपद मिळवण्याच्या दृष्टीने पाहत आहे. 14 ऑक्टोबरपासून मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश या सामन्याला सुरुवात होणार आहे
पाच सामन्याच्या वन-डे मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाबरोबर सुरु असलेल्या तीन टी-20मधून रहाणेला वळळण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलिया दौरा झाल्यानंतर 22 ऑक्टोबरपासून न्यूझीलंड आणि भारताची मालिका सुरु होणार आहे. अशावेळी कोणत्याही खेळाडूसाठी दोन आठवड्यांची विश्रांती ही पुरेशी असते. पहिल्या सामन्यात मुंबईचे महत्वाचे खेळाडू हे भारत अ आणि अध्यक्षीय संघाकडून खेळत आहेत. अशावेळी अजिंक्य रहाणे मुंबईच्या संघात असणं फायदेशीर ठरु शकलं असतं. मात्र अजिंक्यने पहिल्या सामन्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचं सांगितल्याने निवड समितीला चांगलाच धक्का बसला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.