मुंबई : सध्याच्या घडीला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, त्याचे पुनरागमन, निवृत्ती हे चर्चेचे विषय आहेत. धोनी या वर्षी तरी भारतीय संघ दिसणार नाही, असे म्हटले जात आहे. पण दुसरीकडे त्याच्या जागी संघात स्थान मिळवलेल्या रिषभ पंतचेही काही चांगले चालले दिसत नाही. त्यामुळेच धोनी आणि पंत यांच्याबद्दल एक सुचक वक्तव्य करत निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी षटकार ठोकला आहे.
पंत हा धोनीचा पर्याय आहे, असे लोकांच्या मनावर बिंबवण्यात आले. पंतही धोनीची नक्कल करत राहीला आणि त्यामध्येच तो अडकला. धोनीची नक्कल करता करता पंत आपल्यातील गुणवत्ता हरवून बसला. त्यामुळेच त्याची ही अवस्था झाल्याचे मत प्रसाद यांनी व्यक्त केले आहे.
प्रसाद म्हणाले की, " धोनी हा एक महान खेळाडू आहे. जेव्हा तुम्ही एका महान व्यक्तीची तुलना करता तेव्हा तुमच्यावर दडपण वाढत जाते. हीच गोष्ट पंतच्या बाबतीतही घडली आहे. पंतने आपल्या गुणवत्तेनुसार खेळ करायला हवा. सध्या त्याच्या फॉर्म चांगला नाही. रोहित शर्मा आणि सुनील गावस्कर म्हणतात तसे त्याला वेळ द्यायला हवा."
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागल्या आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. त्यानं दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, बांगलादेश या मालिकेतून विश्रांती घेतली आणि मायदेशात होणाऱ्या विंडीजविरुद्धच्या मालिकेतही त्याचा संघात समावेश नाही. त्यामुळे धोनीच्या मनात नेमकं काय चाललंय, याचा अंदाज कुणालाही बांधता येत नाही. पण, बुधवारी धोनीनंच याचं उत्तर दिलं.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या मालिकेतून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, असे वाटत होते. मात्र, निवड समितीनं जाहीर केलेल्या ट्वेंटी-20 आणि वन डे अशा दोन्ही संघांत धोनीचं नाव नसल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. विंडीजविरुद्ध धोनी पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रीय होऊ शकतो, अशा चर्चा होत्या. पण, आता धोनी नक्की कधी मैदानावर दिसेल, याची पुन्हा एकदा उत्सुकता लागली आहे.
विंडीज मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया, श्रीलंका हे संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या तीनही मालिकेत धोनीचा संघात समावेश नसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका कार्यक्रमासाठी धोनी बुधवारी मुंबईत आला होता. त्यावेळी त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी परतणार असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला,'' जानेवारीपर्यंत मला काही विचारू नका.'' धोनीच्या या उत्तरानं पुन्हा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीचं 'टायमिंग' ठरलं; स्वतः करणार घोषणाधोनीच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवृत्तीचं टायमिंग ठरलेलं आहे आणि माही स्वतः त्याची घोषणा करेल, असे समजते. इंडियन प्रीमिअर लीगनंतर धोनी निवृत्तीबाबत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ''आयपीएलनंतर धोनी त्याच्या भविष्याबाबतचा निर्णय घेईल. तो एक मोठा खेळाडू आहे आणि त्याच्या निवृत्तीबाबतच्या चर्चा होतच राहणार. मागील एका महिन्यापासून तो कसून मेहनत घेत आहे आणि तो तंदुरुस्त आहे. आयपीएलपूर्वी धोनी किती स्पर्धात्मक सामने खेळतो, यावरही सर्व अवलंबून आहे,''असे सूत्रांनी सांगितलं.