मुंबई : भारताच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली. आता २०२१ सालापर्यंत शास्त्री हे भारताच्या प्रशिक्षकपदी कायम राहतील. यावेळी शास्त्री यांच्यासाठी अनुभव हा या पदासाठी महत्वाचा मुद्दा ठरला असे म्हटले जात आहे. पण आतापर्यंत फक्त दोन वर्षेच त्यांनी भारताचे मुख्य प्रशिक्षक भूषवले, पण मग कोणता अनुभव त्यांच्या कामी आला, याची चर्चा सुरु आहे.
बीसीसीआयने प्रशिक्षक नियुक्तीसाठी माजी कर्णधार कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समितीची स्थापना केली होती. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी आज सकाळी साडे दहा वाजता मुलाखती सुरू झाल्या. या साऱ्या मुलाखतींमध्ये शास्त्री यांचा अनुभव महत्वाचा ठरल्याचे समजले जात आहे.
टॉम मुडी, माईक हेसन, फिल सिमन्स, लालचंद राजपूत, रॉबिन सिंग आणि रवी शास्त्री हे प्रशिक्षक पदासाठीचे उमेदवार होते. पण या साऱ्यांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव शास्त्री यांच्याकडेच जास्त असल्याचे पाहायला मिळाले. शास्त्री यांच्या नावावर ८० कसोटी आणि १५० वनडे सामने आहेत. दुसरीकडे या शर्यतीत जे दुसऱ्या क्रमांकावर होते, त्या हेसन यांना एकाही आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव नाही. दुसरीकडे टॉम मुडी यांच्याकडे ८ कसोटी आणि ७६ वनडे सामन्यांचा अनुभव आहे. रॉबिन सिंग यांच्या नावावर एकमात्र कसोटी आहे, तर लालचंद राजपूत यांच्या नावावर दोन कसोटी सामने आहेत. फिल सिमन्स यांच्या नावावर २६ कसोटी आणि १४३ वनडे सामने आहेत. त्यामुळे सर्व उमेदवारांचा विचार केला तर शास्त्री यांच्याकडेच जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळल्याचा अनुभव असल्याचे दिसत आहे.
'हेड कोच' पदासाठी इच्छुक असलेल्या माजी क्रिकेटपटूंची कारकीर्द
रवी शास्त्री - ८० कसोटी, १५० वनडे (वय ५७ वर्षे)
टॉम मुडी - ८ कसोटी, ७६ वनडे (वय ५३ वर्षे)
माईक हेसन - खेळाडू म्हणून अनुभव नाही (वय ५६ वर्षे)
फिल सिमन्स - २६ कसोटी, १४३ वनडे (वय ५६ वर्षे)
लालचंद राजपूत - २ कसोटी, ४ वनडे (वय ५७ वर्षे)
रॉबिन सिंग - १ कसोटी, १३६ वनडे (वय ५५ वर्षे)