सचिन कोरडे : गोमंतकीय भूमीतील झळकाविलेले नाबाद शतक म्हणजे माझ्या कारकिर्दीसाठी एक प्रकारे ‘बुस्ट’च. या शतकाचे महत्त्व मला शब्दातून सांगता येणार नाही. कारण, गेल्या वर्षी मी रणजी स्पर्धेत खेळलो नव्हतो. मला आसामाकडून ‘एनओसी’ मिळाली नव्हती. खेळण्यासाठी खूप धडपड केली. मात्र, नशिबाने साथ दिली नाही. त्यामुळे गेल्या सत्रात वंचित राहिलो. गोव्याकडून या सत्रात खेळतोय. एक व्यावसायिक खेळाडू म्हणून मोठी जबाबदारी आहे. गेल्या दोन सामन्यांत पाहिजे तशी कामगिरी झाली नाही. त्यामुळे संधीच्या शोधात होतो. अखेर गोमंतकीय भूमीत बॅट तळपली. लय मिळाली. झारखंडविरुद्ध झळकाविलेल्या या शतकाने आत्मविश्वास उंचावला आहे, अशी प्रतिक्रिया शतकवीर अमित वर्मा याने ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अमित हा कर्नाटकचा. मात्र, व्यावसायिक खेळाडू म्हणून त्याने आसामकडून प्रतिनिधित्व केले होते. गेल्या वर्षांपासून तो रणजी स्पर्धेत खेळण्यासाठी धडपड करीत होता. मात्र, संधी मिळत नव्हती. अखेर गोवा क्रिकेट संघटनेने अमित वर्मा याला संघात घेतले. त्याच्यावर विश्वास दर्शवला. अमितनेही गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही क्षेत्रात गोव्यासाठी उत्तम योगदान दिले आहे. शतकीय खेळीनंतर अमित म्हणाला, झारखंडविरुद्ध आमची सुरुवात चांगली झाली नव्हती. सुमिरण आणि माझ्यावर दबाव वाढला होता. मात्र, ज्युनियर असलेल्या सुमिरणने मला उत्तम साथ दिली. तू आपला नैसर्गिक खेळ कर, असा सल्ला मी त्याला दिला. त्यानेसुद्धा संथ आणि शांत खेळ केला. आमच्या दोघांत उत्तम ताळमेळ जमला. त्यामुळे आमच्यात द्विशतकीय भागीदारी झाली. उद्या सुरुवातीला १२-१५ षटके चांगल्या पद्धतीने खेळून काढल्यास गोवा संघ वर्चस्व गाजवेल, असेही अमितने सांगितले.
जीसीएचे आभार..अत्यंत कठीण समयी मला जीसीएने आपल्या संघात घेतले आहे. अध्यक्ष सूरज लोटलीकर, सचिव दया पागी आणि चेतन देसाई यांचा मी आभारी आहे. गोव्याकडून संधी मिळाली नसती तर कदाचित आज माझ्या नावावर शतक नसते. त्यामुळे मी या सर्वांचा मनापासून आभारी आहे, असेही अमित म्हणाला.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कामगिरीबंगळुरू येथील ३२ वर्षीय अमित वर्मा याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६९ सामन्यांत ३९४४ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या नावावर ११ शतके आणि १६ अर्धशतकांचा समावेश आहे. १७३ धावांची खेळी सर्र्वाेच्च होती. गोलंदाजीत अमितने ६९ सामन्यांत ६२ बळी घेतले आहेत. यामध्ये ६१/५ अशी त्यांची सर्वाेच्च कामिगिरी आहे. २००७ मध्ये अमितने दिल्लीविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटला सुरुवात केली होती. गोव्याकडून खेळताना त्यांची आजची खेळी सर्वाेच्च ठरली. याआधी, अमितने कर्नाटकविरुद्ध पहिल्या डावात नाबाद १६५ धावांची खेळी केली होती.