Join us  

जखमी गुडघ्यासह विश्वचषकाचा उपांत्य सामना खेळलो

शमीचा खुलासा : धोनी आणि संघ व्यवस्थापनाने दिला होता धीर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 12:28 AM

Open in App

नवी दिल्ली : ‘विश्वचषक २०१५ च्या आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यादरम्यान गुडघ्याला जखम असल्याने चालणेदेखील कठीण झाले होते. तथापि, तत्कालीन कर्णधार महेद्रसिंग धोनी आणि संघ व्यवस्थापनाने धीर दिल्यामुळे मी तो सामना खेळलो,’असा खुलासा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने गुरुवारी केला.

माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याच्यासोबत इन्स्टाग्रामवरील चर्चेत शमीने त्यावेळी घडलेले किस्से सांगितले. तो म्हणाला, ‘इतक्या मोठ्या सामन्यात शमीशिवाय अन्य गोलंदाजाला खेळविण्यास धोनी तयार नव्हता. त्याच्या आग्रहापुढे नमते घेत वेदनाशामक औषध घेऊन मी मैदानात उतरलो होतो. त्याआधी सिडनीत सामना खेळलो, मात्र गुडघ्याच्या जखमेमुळे करिअर धोक्यात आले होते. त्यावर शस्त्रक्रिया करून घ्यावी लागल्याने २६ मार्च २०१५ नंतर पुढचा आंतरराष्टÑीय सामना मी जुलै २०१६ ला कसोटीच्या रूपाने खेळलो. ’खरेतर विश्वचषकाच्या मोहिमेदरम्यान मोहम्मद शमीची जखम लपविण्यात आली होती. तो सरावादररम्यान गुडघ्याला पट्टी बांधायचा. याशिवाय सामन्याआधी वेदनाशमक इंजेक्शन घ्यायचा. याविषयी शमी म्हणाला, ‘जखमी होतो तरीही संपूर्ण स्पर्धा खेळलो. फिजियो नितीन पटेल यांच्यामुळेच २०१५ ला प्रत्येक सामना खेळणे शक्य झाले होते. पहिल्या सामन्यातच गुडघ्याच्या दुखण्याचे विपरीत परिणाम पुढे आले. गुडघा आणि जांघ एकसारखे सुजले होते. डॉक्टर प्रत्येक दिवशी पस बाहेर काढायचे. इंजेक्शनमुळे मी खेळू शकत होतो. त्यावेळी पहिल्या पाच षटकात मी केवळ १६ धावा दिल्या होत्या. नंतरच्या पाच षटकात वेदना वाढत गेल्या. एकूण दहा षटकात मी ६८ धावा मोजल्या आणि एकही गडी बाद करता आला नाही.’

स्टीव्ह स्मिथचे शतक आणि भारतीय फलंदाजांचे अपयश यासाठी हा सामना स्मरणात राहील. याविषयी शमी म्हणतो, ‘फलंदाज अपयशी ठरल्याने आम्हाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. इतक्या वाईट स्थितीत मी आधीही खेळलो नव्हतो. अनेकांनी मला करिअर संपून जाईल, अशी भीती दाखवली, मात्र आजही मी खेळत आहे.’(वृत्तसंस्था)‘उपांत्य सामन्याआधी मी सहकाऱ्यांना म्हणालो, ‘ही जखम असह्य झाली आहे. सामन्याच्या दिवशी फार वेदना सुरू होत्या. संघ व्यवस्थापनासोबत बोललो तेव्हा सर्व व्यवस्थित होईल, असा धीर मिळाला. माही आणि संघ व्यवस्थापनाने माझ्यात आत्मविश्वासाचा संचार केला. उपांत्य सामन्यात नवख्या गोलंदाजांसह खेळू शकत नाही, असे मला सांगण्यात आले होते.’- मोहम्मद शमी

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघमोहम्मद शामी