प्रॉव्हिडेन्स (गयाना) : शानदार फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाला टी२० विश्वचषकाची उपांत्यफेरी गाठण्यात फारशी अडचण आलेली नाही. तथापि शनिवारी भारतीयांना स्पर्धेत सर्वांत कठीण सामना आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे. उभय संघांसाठी हा सामना औपचारिक आहे खरा, पण यातून वर्चस्व सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.
जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात असलेले भारत आणि आॅस्ट्रेलिया यांनी प्रत्येकी एक साखळी सामना शिल्लक राखून उपांत्य फेरी गाठली. आॅस्ट्रेलियाला पराभूत केल्यास उपांत्य सामन्यात मनोबल उंचावेल, याची भारताला जाणीव आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन सामने जिंकले आहेत. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिने पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकवून आपला इरादा स्पष्ट केला होता. अनुभवी मिताली राजने दोन अर्धशतके ठोकून आपला दर्जा दाखवून दिला. संघाला गरज असताना मितालीने योगदान दिले हे विशेष.
हरमनप्रीतच्या आठ षटकारांना कायम स्मरणात ठेवले जाईल. मितालीने पाक आणि त्यानंतर आयर्लंडविरुद्ध १७ वे टी-२० अर्धशतक ठोकले. आॅस्ट्रेलिया देखील शानदार फॉर्ममध्ये असून पहिल्या सामन्यात पाकवर ५२ धावांनी, आयर्लंडवर नऊ गडी राखून तसेच न्यूझीलंडवर ३३ धावांनी विजय साजरा केला. मेग लानिंग हिच्या नेतृत्वाखालील संघात अनेक मॅचविनर खेळाडू आहेत. यष्टिरक्षक एलिसा हिली शानदार फॉर्ममध्ये असून गेल्या आठ डावांत सहा अर्धशतके ठोकली आहेत.
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, मिताली राज, जेमिमा रॉड्रिग्ज, वेदा कृष्णामूर्ती, दीप्ती शर्मा, तान्या भाटिया, पूनम यादव, राधा यादव, अनुजा पाटील, एकता बिश्त, दयालन हेमलता, मानसी जोशी, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी.
आॅस्ट्रेलिया : मेग लानिंग(कर्णधार), रसेल हेनिंग्स, निकोल बोल्टन, अॅश्ले गार्डनर, एलिसा हीली, डेलिसा किमिन्स, सोफी मोलिने, बेथ मूनी, एलिसे पेरी, मेगान शट, एलिसे विलानी, टायला वी, जार्जिया वारेहम, निकोला कारे.
सामना: रात्री ८.३० पासून
Web Title: Before the semifinals, the Indian women today fought against the Aussies
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.