Senior Women’s One Day Trophy : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या पुरुष आणि महिला गटात वनडेचा थरार सुरु आहे. एका बाजूला पुरुष गटात विजय हजारे ट्रॉफीसाठी सामने खेळवले जात आहे. दुसऱ्या बाजूला महिला गटातील वूमेन्स सिनियर वन डे ट्रॉफी (Senior Women's One Day Trophy) स्पर्धा अखेरच्या टप्प्यात पोहचली आहे. मंगळवारी मुंबई आणि दिल्ली या दोन महिला संघात रोमहर्षक लढत पाहायला मिळाली. क्वार्टर फायनलमधील हायहोल्टेज सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. ज्यात दिल्ली महिला संघासमोर मुंबई महिला संघानं बाजी मारत सेमी फायनलचं तिकीट पक्के केले.
सुपर ओव्हरमध्ये मुंबईचा सुपर विजय
मुंबई संघाला विजय मिळवून देण्यात WPL च्या मिनी लिलावात मेगा बोली लागलेल्या मुंबईकर सिमरन शेखनं लक्षवेधी खेळी केली. सुपर ओव्हरमध्ये सिमरन शेखनं २ चौकार आणि २ षटकार मारत मुंबईच्या संघाला सुपर विजय मिळवून दिला. सिमरन ही मुंबईतील धारावीच्या झोपडपट्टीतून आलेली प्रतिभावंत क्रिकेटर आहे.
WPL २०२४ च्या मिनी लिलावातील महागड्या छोरीनं बॅक टू बॅक सिक्सर मारत संपवली मॅच
WPL मिनी लिलावात मुंबईकर सिरमन शेखसाठी गुजरात जाएंट्स फ्रँचायझी संघानं १ कोटी ९० लाख इतकी तगडी बोली लावून आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. ती WPL 2024 च्या मिनी लिलावातील सर्वात महागडी खेळाडूही ठरली. आपल्यावर मोठी बोली उगाच लागलेली नाही, तेच मुंबई संघाकडून खेळताना या मुंबईकर छोरीनं दाखवून दिलं आहे.
दिल्लीच्या संघानं अखेरच्या षटकात ७ धावांची गरज असतान ६ धावा काढल्यामुळे सुपर ओव्हरमध्ये गेला सामना सिनियर महिला वनडे ट्रॉफी स्पर्धेतील दिल्ली विरुद्धच्या लढतीत पहिल्यांदा बॅटिंग करताना मुंबई महिला संघानं वृषाली भगतच्या १३४ (१२४) दमदार शतकाच्या जोरावर ७ विकेट्सच्या जोरावर निर्धारित ५० षटकात ३२१ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्ली महिला संघाकडून आयुषी सोनीनं नाबाद ९७ धावांची खेळी केली. पण अखेरच्या षटकात आवश्यक ७ धावा काढण्यात दिल्लीचा संघ मागे पडला. हा सामना बरोबरीत सुटला.
सुपर ओव्हरमध्ये सिमरन शेखची हवा
क्वार्टर फायनल लढत टाय झाल्यावर सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. नियमानुसार, धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीच्या संघानं पहिल्यांदा बॅटिंग करताना सुपर ओव्हरमध्ये १७ धावा करत मुंबईसमोर १८ धावांचे टार्गेट सेट केले. मुंबईची कॅप्टन हुमैरा काझी हिने पहिल्या चेंडूवर एक धाव घेत सिमनरला स्ट्राइक दिले. त्यानंतर सिमरन हिने दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार मारल्यावर चौथ्या चेंडूवर दुहेरी धाव घेतली. उर्वरित दोन चेंडूवर दोन षटकार मारत तिने मुंबईला सुपर विजय मिळवून दिला.