मुंबई : कॉफी विथ करण 6 कार्यक्रमातील वादग्रस्त विधानानंतर हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांची नाचक्की झाली. महिलांचा अनादर करणाऱ्या त्या वक्तव्यामुळे पांड्या व राहुल यांच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) निलंबनाची कारवाई करावी लागली. त्यामुळे या दोघांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी बोलावण्यात आले. त्यामुळे भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी संघातील वरिष्ठ खेळाडूंनी युवकांना कारकिर्दीच्या सुरुवातीलाच योग्य मार्गदर्शन करावे, असे मत महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.
निलंबनाची कारवाई मागे घेलत्यानंतर पांड्या न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत खेळला, तर राहुलने भारत A संघाचे प्रतिनिधित्व केले. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून राहुल राष्ट्रीय संघात परतला. ''कारकिर्दीच्या सुरुवातीलाच युवा खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे. कारण सातत्यपूर्ण खेळाबरोबरच क्रिकेटप्रेमींची त्यांच्याकडून अपेक्षाही वाढत जाते. त्यामुळे त्यांना भरपूर प्रसिद्धीही मिळते, पण त्यात अनेकदा हे खेळाडू वाहून जातात. त्यामुळे संघातील वरिष्ठ खेळाडूंनी त्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे,''असे गावस्कर म्हणाले.
न्यूझीलंड दौऱ्यात पांड्यानं संघात दमदार कमबॅक केले, तर राहुलनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत 50 व 47 धावांची खेळी साकारली.