मतीन खान,
लंका हा देश सध्या मोठ्या संकटांना सामोरा जात आहे. अन्न, औषधे, वीज, इंधन अशा जीवनावश्यक घटकांना बहुसंख्य नागरिक पारखे झाले आहेत. त्या देशाचा असा क्रिकेट संघ, ज्याच्या विजयाची कुणी कल्पना केली नव्हती. तज्ज्ञांनी जेतेपदाच्या शर्यतीत त्यांना शून्य टक्के संबोधले होते. तरीही आशियातील दोन दिग्गज भारत आणि पाकिस्तानला धूळ चारून लंकेने थाटात आशिया चषक उंचावलाच! खेळापेक्षा खेळाडूंचे आणि सांघिक यशापेक्षा वैयक्तिक कौशल्याचे स्तोम माजवणारे या दोन्ही देशांतील क्रिकेटप्रेमी श्रीलंकेच्या यशासमोर खुजे वाटू लागतात, ते यामुळेच.
जवळपास २ कोटी २० लाख लोकसंख्येचा श्रीलंका १९४८ ला स्वतंत्र झाल्यापासून प्रथमच सर्वांत खराब संकटाचा सामना करीत आहे. वृत्तपत्र छपाईसाठी कागद नाही. पुस्तके, वह्यांसाठी कागद उपलब्ध नसल्याने परीक्षा रद्द झाल्या. महान फलंदाज आणि आयसीसी रेफ्री रोशन महानामा याने पेट्रोलच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना चहा आणि पाव वाटताना आपण पाहिले. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या भ्रष्ट धोरणाविरुद्ध लोकांनी राष्ट्रपती भवन ताब्यात घेतले होते. राष्ट्रपती प्रासादात लोक चक्क पोहण्याचा आनंद लुटताना दिसले. अशा स्थितीत श्रीलंका आशिया चषकाचे यजमानपदही भूषवू शकत नव्हता. ही स्पर्धा यूएईत पार पडली.
लंकेचा संघ यूएईत दाखल झाला तेव्हा त्यांच्या कर्णधाराचे नाव चाहत्यांना लवकर आठवत नव्हते. दासून शनाका हा रोहित, बाबर, शाकीब आणि नबी या कर्णधारांच्या तुलनेत अनोळखी होता. ११ सप्टेंबरच्या रात्री लंकेने पाकला लोळविताच भानुका राजपक्ष, वानिनदू हसरंगा, कुसाल मेंडिस, धनंजय डिसिल्व्हा, प्रमोद मधुशान, दिलशान मधुशंका ‘नवे हीरो’ ठरले. या सर्वांचे नाव चाहत्यांच्या मनावर राज्य करू लागले.
विजयाची पाच कारणे...
लंकेच्या खेळाडूंवर दडपण नव्हते. रोहित, विराट, बाबर, रिझवान यांच्यावर माध्यमांचा आणि चाहत्यांचा दबाव होता, त्या तुलनेत लंकेचे खेळाडू स्वच्छंदपणे खेळले. त्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीही नव्हते.
या दिग्विजयाचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे, कोणा एक-दोन खेळाडूंच्या कौशल्यावर विसंबून न राहता प्रत्येक सामन्यात वेगवेगळ्या खेळाडूंनी योगदान दिले. याला म्हणतात सर्वंकष सांघिक प्रयत्न!
शनाकाचे शांतचित्त नेतृत्व पाहून धोनीची आठवण झाली. कठीणसमयीदेखील खेळाडूंना धीर देण्याची त्याची वृत्ती चांगलीच भावली.
कोच सिल्व्हरवुड यांचीही भूमिका मोलाची ठरली. निर्णायक लढतीत ७१ धावा ठोकणारा भानुका राजपक्ष या स्पर्धेपूर्वी फिटनेसच्या समस्येमुळे निवृत्तीच्या विचारात होता. सिल्व्हरवुड यांनी त्याचे मन वळविले. मैदानाबाहेरून ‘कोडवर्ड’च्या माध्यमातून कर्णधाराला मार्गदर्शन केले. त्यांची क्लृप्ती चर्चेचा विषय ठरली.
युवा आणि नवख्या खेळाडूंच्या बळावर लक्ष्याचा भेद घेण्याची लंकेची वृत्ती शानदार ठरली. पहिल्या पराभवानंतरही ते प्रत्येक सामना हा जणू अंतिम सामन्याप्रमाणे खेळले. देशासाठी चषक जिंकायचाच या निर्धाराने खेळून जिंकलेदेखील.
‘अभी गनीमत है सब्र मेरा,
अभी लबालब भरा नहीं हूँ
वो मुझको मुर्दा समझ रहा है,
उससे कहो मैं मरा नहीं हूँ’!!
(लेखक लोकमत पत्रसमूहात स्पोर्ट्स हेड- सहायक उपाध्यक्ष )
Web Title: ... Senya kaho main mara nahin hoon ! Even during the crisis, Sri Lanka showed victory
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.