बार्बाडोस : खराब फॉर्ममध्ये असलेल्या वेस्ट इंडीजविरुद्ध पहिला सामना जिंकण्यात यशस्वी ठरलेला भारतीय संघ शनिवारी दुसऱ्या सामन्यात बाजी मारून सलग १३ वी ‘वनडे’ मालिका जिंकण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. त्यासाठी फलंदाजी सुधारण्याचे आव्हान असेल. विशेषत: पहिल्या सामन्यात मधल्या फळीने धरसोड वृत्ती दाखविली होती. फलंदाजीत दमदार कामगिरी केली तरच मालिकेत विजयी आघाडी मिळेल, याची भारतीय खेळाडूंना जाणीव आहे. वळण घेणाऱ्या चेंडूंवर धावांचा पाठलाग करताना मधल्या फळीने हाराकिरी केली होती. ११५ धावांचे लक्ष्य सहजपणे गाठले तरी त्यासाठी पाच फलंदाज गमवावे लागले. लहान लक्ष्य गाठण्यासाठी शुभमन गिल-रोहित शर्मा आणि तिसऱ्या स्थानासाठी विराट कोहली पुरेसे आहेत, असे कुणीही सांगू शकेल; पण असे घडू शकले नाही. पहिल्या वनडेत अर्धशतकी खेळी केल्यानंतरही ईशान किशनला आता मधल्या फळीत खेळावे लागेल. वन डे विश्वचषकाआधी भारताला आणखी ११ सामने खेळायचे आहेत. यादृष्टीने संतुलित संघ संयोजनासाठी अधिक प्रयोग करणे टाळावे लागेल.
गुरुवारी या मैदानावर पहिल्या सामन्यात यजमान फलंदाजांनी कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकीपुढे गुडघे टेकले होते. त्याआधी हार्दिक पांड्या आणि उमरान मलिक यांनी नव्या चेंडूवर फलंदाजांना त्रस्त केले. विंडीजने आगामी विश्वचषकाची पात्रता न गाठल्याने या संघाची लोकप्रियतादेखील घसरली. दुसऱ्या वनडेत आधीच्या खेळपट्टीचा वापर होणार नसला तरी भारतीय संघाला सुरुवातीला फलंदाजी करण्यास अडसर येऊ नये. गुडाकेश मोती आणि यानिक कारिया यांची फिरकी खेळणे अवघड वाटू नये; पण हे सोपेदेखील नाही. फिरकीविरुद्ध आमचे दिग्गज फलंदाज का अपयशी ठरले, याचा विचार करावा लागेल. सूर्याकडे गुरुवारी संधी होती, मात्र मोतीच्या चेंडूवर स्वीप शॉट खेळण्याच्या नादात तो बाद झाला. श्रेयस आणि लोकेश राहुल फिट झाल्यानंतर आपले स्थान धोक्यात येईल, याची जाणीव असताना सूर्या अपयशी ठरल्याने त्याच्या वाटचालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), ईशान किशन (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.
वेस्ट इंडीज : शाय होप (कर्णधार), रोवमन पॉवेल, एलिक अथानाजे, यानिक कारिया, कीसी कार्टी, डोमिनिक ड्रेक्स, शिमरोन हेटमायेर, अलजारी जोसेफ, ब्रेंडन किंग, काइल मायर्स, गुडाकेश मोती, जेडेन सील्स, रोमारियो शेफर्ड, केविन सिनक्लेयर, ओशाने थॉमस.