नवी दिल्ली: ‘गौतम गंभीर यांना प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारून केवळ दोन-तीन महिने झाले. बांगलादेशविरुद्ध मालिका विजयाचे श्रेय त्यांना देणे हे व्यक्तिपूजेचे उदाहरण ठरेल. ब्रेंडन मॅक्युलम ज्या पद्धतीने फलंदाजी करायचा, तशी निर्भीड फलंदाजी गंभीर यांनी क्वचितच केली असेल. त्यामुळे जर श्रेय द्यायचेच असेल, तर ते फक्त रोहित शर्मा याला द्यायला हवे, बाकी कोणालाही नाही,’ असे रोखठोक वक्तव्य दिग्गज सुनील गावसकर यांनी सोमवारी केले.
भारतीय फलंदाजांच्या निर्भीड खेळण्याच्या भूमिकेला ‘रोहित’ असे टोपणनाव नाव देता येऊ शकेल, असेही गावसकरांनी सुचवले आहे. बांगलादेशविरुद्ध कानपूर कसोटीचा निकाल लागेल की नाही, याची पावसामुळे शाश्वती नसतानाही भारताने अविश्वसनीय खेळ करीत विजय संपादन केला. अडीच दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतरही भारताने आक्रमक फलंदाजी करीत या सामन्यात विजय मिळवला होता.
त्यानंतर अशा फलंदाजीबाबत चर्चेला सुरुवात झाली. खरे तर इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने जबाबदारी सांभाळल्यापासून त्यांचा संघ कसोटीत आक्रमक खेळताना दिसतो. त्यामुळे ‘बझबॉल’ शैलीची ओळख झाली. भारतानेही काहीसा तसाच पवित्रा कानपूर कसोटीत स्वीकारला. भारतीय संघाच्या या भूमिकेबद्दल अनेकांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला श्रेय दिले. मात्र, गावसकरांच्या मते याचे श्रेय फक्त गंभीरचे नाही, तर कर्णधार रोहित शर्माचे आहे.
दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी केवळ ३५ षटकांचा खेळ झाला. बांगलादेशने पहिल्या डावात ३ बाद १०७ धावा केल्या. त्यानंतर पावसामुळे पुढील दोन दिवस वाया गेले. चौथ्या दिवशी भारताने बांगलादेशचा पहिला डाव २३३ धावांवर गुंडाळला. त्यानंतर वादळी फलंदाजी करीत पहिला डाव ९ बाद २८५ धावांवर घोषित केला आणि ५२ धावांची आघाडी घेतली. पाचव्या दिवशी बांगलादेशला पुन्हा १४६ धावांत गुंडाळून विजयासाठी ९५ धावांचे लक्ष्य स्वीकारले. हे लक्ष्यदेखील १७.२ षटकांत पार केले.
भारतीय फलंदाजांबाबत गावसकरांनी स्पोर्टस्टारच्या स्तंभात लिहिले, ‘एका वृत्तापत्राने लिहिले की भारताची फलंदाजी ‘बझबॉल’ होती. रोहितने हा मार्ग दाखविला होता. मात्र, काही जुन्या जाणत्यांनी गौतम गंभीरमुळे हे साध्य झाल्याचे सांगून या विजयाला ‘गमबॉल’ संबोधले. त्यावर गावसकर यांचे मत असे की, ‘इंग्लंडने कर्णधार बेन स्टोक्स आणि प्रशिक्षक मॅक्युलमच्या कार्यकाळात फलंदाजीची दिशा बदलली. रोहितही गेल्या काही वर्षांपासून तशी फलंदाजी करीत आहे. शिवाय संघालाही आक्रमक खेळण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.’
जो होगा वो देखा जायेगा : रोहित शर्मा
ऋषभ पंतने लढवलेली शक्कल जगासमोर मांडताना भारतीय कर्णधार रोहित शर्माने टी-२० विश्वचषकातील अजून एका गोष्टीचा खुलासा केला आहे. हिटमॅन म्हणाला, ‘डेव्हिड मिलर आणि हेन्रिक क्लासेन भारतीय संघावर भारी पडायला लागले होते. सामना हातून निसटतो की काय, अशी भीती सगळ्यांना वाटत होती. तेव्ही संघातील सर्व खेळाडूंना स्लेजिंग करण्याचा परवाना दिला. तुम्हाला वाटते ते बोला; पण त्यांच्यावर दबाव निर्माण करा. पंचांनी किंवा सामन्याधिकाऱ्यांनी काही दंड ठोठावलाच तर ते मी बघून घेईल.’ टी-२० विश्वचषकातील रोहितने केलेले खुलासे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Web Title: series win credited to rohit sharma alone said sunil gavaskar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.