भारताने टी-२० मालिकेत वेस्ट इंडिजवर २-१ असा विजय मिळविला. हा विजय नक्कीच मैलाचा दगड ठरला आहे. विश्व चॅम्पियनशिप नजीक असताना हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे, तरीही संघाच्या रचनेची समस्या कायम आहे. विंडीजचा संघ या प्रकारात दहाव्या क्रमांकावर असला तरी त्यांची जिंकण्याची क्षमता व लढण्याची पद्धत चकित करण्यासारखी आहे. या स्वरूपात वेस्ट इंडिजचा संघ वर्चस्व गाजवत आहे.
या प्रकारात कर्णधार म्हणून पोलार्डची निवड योग्य ठरली. त्याच्याकडे भारतीय खेळपट्ट्यांवर खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे त्याच्याकडे योग्यवेळी कर्णधारपद देण्यात आले आहे. पोलार्ड अनेक वर्षांपासून वेस्ट इंडिजच्या संघात आत-बाहेर करीत होता. त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपली असे वाटत असतानाच त्याच्या कारकिर्दीला संजीवनी मिळाली. त्यासोबतच पुढे एक नवीन आव्हान मिळाले.
भारताचा विजय नक्कीच कौतुकास्पद होता. प्रत्येक सामन्यात भारतीय खेळाडूंना मोठ्या आव्हानाला समोरे जावे लागले. भारताने कठोर खेळ केला हे शेवटच्या सामन्यात ठळकपणे दिसले. ही मालिका समतोल होती. भारताने सर्व प्रकारच्या आव्हानांचा सामना केला. रोहित
शर्मा, के. एल. राहुल आणि विराट कोहली हे चमकदार फॉर्ममध्ये दिसले.
तिन्ही सामने मोठ्या धावसंख्येचे होते. त्यामुळे भारतीय संघाला मोठ्या परीक्षेला सामोरे जावे लागले. भारताला पोलार्ड, हेटमायेर, लुईस आणि पुरन यांच्यावर नियंत्रण देखील ठेवावे लागले. भारतीय संघाच्या रचनेबद्दल काही महत्त्वाच्या बाबी आहेत.
भारतीय संघ टी-२० मध्ये काहीसा कमकुवत आहे. कसोटी आणि एकदिवसीय प्रकारात अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेला भारतीय संघ टी-२०मध्ये पाचव्या स्थानावर आहे. टी-२० हे अस्थिर आणि अनपेक्षित आहे. राहुल शर्मा आणि कोहली यांनी शानदार फलंदाजी केली. अय्यरने संघ व्यवस्थापनाला आश्वस्त केले. रिषभ पंतचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. तो संघाच्या गणितांमध्ये मोठा अडसर ठरत आहे.
बुमराह, कुलदीप, शमी आणि युझवेंद्र हे तज्ज्ञ गोलंदाज असले तरी ते फलंदाजी करू शकत नाहीत. त्यामुळे टी-२० मध्ये काहीशा अडचणी येतात. त्यामुळे अष्टपैलू खेळाडूंचे असणे आवश्यक झाले आहे. जडेजाला पुन्हा बोलविण्यात आले. शिवम दुबेला आपले कौशल्य दाखविण्यास वाव मिळत आहे. या दोघांपैकी एकाची निवड ही खेळपट्टीच्या स्वरूपावर आणि प्रतिस्पर्धी संघाच्या गुणवत्तेवर आधारित आहे.
- अयाझ मेमन कन्सल्टिंग एडिटर लोकमत
Web Title: The series wins the milestone, but the problem persists
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.