Michael Neser Hamstring Injury, IND A vs AUS A: भारतीय संघाची आगामी कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाविरूद्ध त्यांच्या भूमीवर होणार आहे. या मालिकेसाठी १० नोव्हेंबरला भारतीय संघ रवाना होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या संघाची घोषणा आधीच करण्यात आली आहे. मात्र त्या आधी सुरु असलेल्या अनौपचारिक भारत अ विरूद्ध ऑस्ट्रेलिया अ सामन्यातून एक महत्त्वाची अपडेट मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाला एक मोठा धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज मायकेल नेसर हा स्नायूंच्या दुखापतीमुळे उर्वरित सामन्यातून बाहेर पडला आहे.
दुसऱ्या अनधिकृत कसोटीच्या पहिल्या दिवशी मायकल नेसरने भेदक मारा करत चार बळी घेतले होते. अवघ्या २७ धावांत ४ बळी अशी त्याची कामगिरी होती. पण नेसरला १३व्या षटकातील दुसऱ्या चेंडूनंतर अचानक दुखापत झाली. सुरुवातीला तो मैदानातच व्हिवळला आणि नंतर तो लगेचच मैदानाबाहेर गेला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या (सीए) प्रवक्त्याने ईएसपीएनक्रिकइन्फोला दिलेल्या माहितीनुसार, मायकल नेसरला डाव्या हाताला दुखापत झाली आहे आणि तो सामन्यात पुन्हा गोलंदाजी करू शकणार नाही. दुखापतीची तीव्रता जाणून घेण्यासाठी त्याचे स्कॅनिंग केले जाणार आहे.
याआधी २३ ऑक्टोबर रोजी शेफिल्ड शील्ड स्पर्धेतील सामन्यानंतरही त्याच्या त्याच स्नायूंमध्ये वेदना जाणवली होती. त्यावेळी दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्वीन्सलँड संघाकडून ४८.५ षटके टाकली होती. या दुखण्यामुळे त्याला दोन दिवसांनंतर दक्षिण ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या होम वनडे चषकाच्या सामन्याला मुकावे लागले होते. पर्थमध्ये पहिल्या कसोटीसाठी नेसरचा ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश होण्याची शक्यता नव्हती. पण सध्या ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांना ज्या आव्हानांचा सामना करावा लागतोय, त्या तुलनेत ही दुखापत व्यवस्थापनाची चिंता वाढवणारी आहे.