Steve Smith Mitchell Starc, Australia: ऑस्ट्रेलियन संघाने भारतात 5 ऑक्टोबरपासून होणार्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी आपला प्राथमिक संघ जाहीर केला. यामध्ये सर्व प्रमुख खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. तसेच दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या वनडे मालिकेसाठीही क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून संघाची घोषणा करण्यात आली. पण आता आफ्रिका दौऱ्यापूर्वी स्टीव्ह स्मिथ आणि मिचेल स्टार्कच्या रूपाने संघाला दोन मोठे झटके बसले आहेत. वन डे विश्वचषकापूर्वी शेवटच्या टप्प्यातील तयारी सुरू आहे. ऑस्ट्रेलियाला आधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि नंतर भारताविरुद्ध मालिका खेळण्याची संधी मिळाली आहे. अशा स्थितीत संघाला पूर्ण क्षमतेने मैदानात उतरायचे होते. पण कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे आधीच आफ्रिके विरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला होता. त्यानंतर आता स्टीव्ह स्मिथ आणि मिचेल स्टार्क दोघांनाही संघातून वगळल्याने हा ऑस्ट्रेलियाला दुहेरी धक्का मानला जात आहे.
स्टीव्ह स्मिथ मनगटाच्या दुखापतीमुळे T20 आणि ODI या दोन्ही मालिकेतून बाहेर पडला आहे आणि त्याच्या जागी ऍश्टन टर्नरला T20 संघात स्थान देण्यात आले आहे. त्यासोबतच मार्नस लॅबुशेनचा ODI संघात समावेश करण्यात आला आहे. मांडीच्या समस्येमुळे मिचेल स्टार्क आफ्रिके विरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला असून त्याच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सनचा समावेश करण्यात आला आहे.
भारता विरुद्धच्या मालिकेत दोघांनी पुनरागमन करावे अशी ऑस्ट्रेलियन चाहत्यांची इच्छा
ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली म्हणाले की, दोन्ही खेळाडू आफ्रिकेच्या दौऱ्यातून बाहेर पडल्यानंतर कामाच्या ताणामुळे आम्हाला या गोष्टीला सामोरे जावे लागत आहे. स्मिथ आणि स्टार्क विश्वचषकापूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त होतील आणि भारता विरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत त्यांचे पुनरागमन अपेक्षित आहे. आफ्रिका दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाला 30 ऑगस्टपासून 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. यानंतर संघ ७ सप्टेंबरपासून यजमान संघाविरुद्ध ५ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.