मॉस्को : सध्याच्या घडीला रशियामध्ये फुटबॉल विश्वचषकाचा ज्वर वाढत चालला आहे. पण याच विश्वचषकासाठी गेलेल्या एका खेळाडूला विचित्र गोष्टीचा सामना करावा लागला आणि त्याला या गोष्टीचा नाहक त्रासही झाला. मॉस्कोच्या विमानतळावर त्याच्या बॅगेतले तब्बल सात लाख रुपये लंपास करण्यात आले.
फुटबॉल विश्वचषकाला सुरुवात अजूनही झालेली नाही. त्यापूर्वीच अशा चोरीच्या घटना घडत असल्यामुळे रशियाच्या नावाला बट्टा लागायला सुरुवात झाली आहे. नायजेरियाच्या संघाचा कर्णधार नवांक्वो कानू याने लंडनहून मॉस्कोसाठी विमान पकडले. जेव्हा त्याचे सामना मॉस्कोमध्ये उतरवले गेले तेव्हा त्याच्या बॅगमधून ही एवढी मोठी रक्कम चोरीला गेली. पण तेव्हा त्याला या चोरीबद्दल काहीच माहिती नव्हते. जेव्हा तो आपल्या हॉटेलला पोहोचला तेव्हा त्याला आपल्या बॅगेतून पैसे चोरीला गेल्या समजले.
आपले पैसे चोरीला गेल्याचे कळताच कानूने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या चोरीचा छडा लावला. लंडनहून जेव्हा विमान मॉस्कोमध्ये दाखल झाले तेव्हा तिथे सामान उचलणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी ही चोरी केल्याचे समोर आले आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.