Join us  

यूएई लीगसाठी सात लाख डॉलरची ऑफर! ऑस्ट्रेलियातील ‘बिग बॅश’ला धोका

सिडनी : संयुक्त अरब अमिरातमधील (यूएई) आंतरराष्ट्रीय लीगने ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या १५ खेळाडूंना ‘बिग बॅश’ लीगमधून माघार घेण्यासाठी  आणि आपल्या ...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2022 5:45 AM

Open in App

सिडनी : संयुक्त अरब अमिरातमधील (यूएई) आंतरराष्ट्रीय लीगने ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या १५ खेळाडूंना ‘बिग बॅश’ लीगमधून माघार घेण्यासाठी  आणि आपल्या लीगमध्ये खेळण्यासाठी सात लाख ऑस्ट्रेलियन डॉलरची ऑफर दिली आहे. यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. 

या दोन्ही लीगचे आयोजन एकाच वेळी होईल. बिग बॅश १३ डिसेंबर ते ४ फेब्रुवारी या काळात प्रस्तावित असून,  आयएल टी-२० चे पहिले आयोजन ६ जानेवारी ते १२ फेब्रुवारी या कालावधीत होईल. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू एकाच वेळी दोन्ही लीगमध्ये खेळू शकणार नाहीत.  ‘सिडनी मॉर्निंग हेरॉल्ड’च्या वृत्तानुसार  किमान १५ खेळाडूंना बिग बॅशमधून माघार घेण्यासाठी आणि यूएई लीग खेळण्यासाठी सात लाख ऑस्ट्रेलियन डॉलरची ऑफर देण्यात आली.

ऑस्ट्रेलियाच्या अव्वल खेळाडूंच्या केंद्रीय करारानुसार कोणत्याही खेळाडूला बीबीएल खेळण्याची सक्ती नाही. डेव्हिड वॉर्नर २०१४ पासून या लीगमध्ये खेळलेला नाही. बीबीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक रक्कम डार्सी शॉर्ट याला (३ लाख ७० हजार ऑस्ट्रेलियन डॉलर) मिळाली. आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मिळणाऱ्या रकमेच्या तुलनेत मात्र ही रक्कम बरीच कमी आहे.  

आयपीएल संघमालकांनी यूएई लीग तसेच द. आफ्रिका टी-२० लीगमध्ये मोठी गुंतवणूक केली. अशा वेळी खेळाडूंना रोखायचे झाल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि बीबीएलला खेळाडूंना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करावीच लागेल.  यूएई लीगमधील रक्कमही बीबीएलच्या तुलनेत अधिक असल्याने सीए आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेटर्स संघटना दडपणात आहे.

टॅग्स :आॅस्ट्रेलिया
Open in App