अंबरनाथ : बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरण ताजे असतानाच आता अंबरनाथमध्येही एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ३५ वर्षीय नराधमाने एका नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला शौचालयात तिचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अंबरनाथमध्ये राहणारी ही अल्पवयीन मुलगी १ जुलै रोजी सार्वजनिक शौचालयात गेली असता तिथे आरोपी संतोष कांबळे याने तिला गाठले आणि जबरदस्तीने तिला अश्लील चित्रफीत दाखवून विनयभंग केला.
बदलापूर आंदोलनानंतर तक्रार दाखल, पोलिसांनी आरोपीला केली अटक घटना घडल्यानंतर पीडित मुलगी आणि तिची आई यांनी पोलिस ठाण्यात येऊन तक्रार करण्याचे धाडस केले नाही, मात्र बदलापूरचे प्रकरण ताजे असताना पीडित मुलीच्या आईला गुन्हा दाखल करण्याची मानसिकता निर्माण झाल्यामुळे त्यांनी दीड महिन्यानंतर हा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने २१ ऑगस्ट रोजी अंबरनाथ पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तत्काळ गुन्हा दाखल केला आणि आरोपी संतोष कांबळे याला बेड्या ठोकल्या. या घटनेची तक्रार येताच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीलाही तत्काळ अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. - जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक