Join us  

शाहरुख खानने केली पुजाराला मदत, 100 व्या कसोटीमुळे जागवल्या आठवणी

त्यामुळे पुजाराचे वडील चेतेश्वरकडे दक्षिण आफ्रिकेला जाऊ शकले. पुढच्या वर्षी २०१० ला पुजारा देशाकडून पहिली कसोटी खेळला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 5:34 AM

Open in App

२००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत आयपीएलचे आयोजन झाले. केकेआरकडून खेळताना पुजाराची हॅमस्ट्रिंग तुटली होती. त्याचे कुटुंब त्याला राजकोटला आणू इच्छित होते. ही बाब केकेआरचा मालक शाहरुख खान याला कळताच त्याने पुजाराच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. अशा दुखापतींवर दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टर यशस्वीपणे सर्जरी करतात, त्यामुळे चेतेश्वरवर दक्षिण आफ्रिकेत सर्जरी व्हायला हवी, असा शाहरुखचा आग्रह होता. यासाठी शाहरुख पुजाराच्या कुटुंबीयांना विमानाने दक्षिण आफ्रिकेला घेऊन जाण्यास तयार होता. मात्र, पुजाराच्या वडिलांनी आपल्याकडे पासपोर्ट नसल्याचे सांगितले. त्यानंतर पासपोर्टसाठी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात आली. त्यामुळे पुजाराचे वडील चेतेश्वरकडे दक्षिण आफ्रिकेला जाऊ शकले. पुढच्या वर्षी २०१० ला पुजारा देशाकडून पहिली कसोटी खेळला होता.

पुजाराची शंभरावी कसोटी

भारतीय क्रिकेटमध्ये प्रसिद्धीच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिलेला फलंदाज चेतेश्वर पुजारा याची ही शंभरावी कसोटी असेल. त्यासाठी त्याला १३ वर्षे लागली. या सामन्यात २० वे शतक ठोकून हा ऐतिहासिक क्षण अविस्मरणीय ठरवेल का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

नैसर्गिक खेळ बदलू शकत नाही, पण अंशत: बदलास तयार 

काही नव्या फटक्यांचा केला समावेश

नवी दिल्ली : कसोटीत सातत्य टिकविण्यासाठी फलंदाजीत काही प्रमाणात लवचिकता असावी, ही ओळखूनच संघ व्यवस्थापना-सोबतच्या चर्चेअंती काही नव्या फटक्यांचा माझ्या फलंदाजीत समावेश केला, असे चेतेश्वर पुजाराने गुरुवारी सांगितले.  ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुक्रवारी सुरू होत असलेली दुसरी कसोटी पुजाराची शंभरावी कसोटी असेल. मागच्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध स्थानिक मालिकेदरम्यान पुजाराला भारतीय  संघाबाहेर ठेवण्यात आले होते. पुजारा  धावा काढत नसल्याने गोलंदाजांवर अनावश्यक दडपण येते, अशी त्यावेळी सबब देण्यात आली होती. ही स्थिती किती कठीण होती, असे विचारताच पुजारा म्हणाला, ‘हे आव्हानात्मक होते. मात्र, मानसिकरीत्या कठोर होण्याची गरज असते.  स्वत:वर विश्वास असायला हवा. माझ्या नैसर्गिक खेळामुळे सुरुवातीच्या सात वर्षांत जे काही करू शकलो ते सर्वांनी पाहिले. नैसर्गिक खेळ बदलू शकत नाही; मात्र सुधारणा करीत काही गोष्टी नव्याने जोडू शकतो.’

पुजाराने १९ शतकांसह सात हजारांहून अधिक धावा केल्या.  आक्रमकतेच्या बळावर एकाहून अधिक प्रकारांत खेळणाऱ्यांकडून किती आव्हान असते, असे विचारताच तो म्हणाला, ‘प्रत्येकाचे कौशल्य वेगळे असते. स्वत:मधील बलस्थानावर अटळ राहा, हे मी इतक्या वर्षांत शिकलो. मागील काही वर्षांत मी नवे शॉट जोडले. कसोटीत पुढे असे फटके मारण्याचे माझे प्रयत्न असतील.’ भारतीय संघातून बाहेर होताच पुजारा कौंटी खेळला. आता शंभरावी कसोटी खेळणारा तो १३ वा भारतीय खेळाडू ठरणार आहे. 

याविषयी तो म्हणाला, ‘राहुल द्रविड आणि विक्रम राठोड यांच्याशी झालेल्या चर्चेमुळे स्पष्टता आली. काही गोष्टींवर भर दिल्यानंतर संघात पुन्हा संधी मिळेल याची खात्री पटली. इंग्लंडमध्ये एकमेव कसोटी खेळण्याची संधी मिळाली होती. सौराष्ट्र आणि ससेक्सकडून काही मर्यादित षटकांचे सामने खेळल्याचादेखील लाभ झाला. हे फटके कसोटीत मारू इच्छित होतो. बांगलादेश विरुद्ध मालिकेतदेखील फलंदाजी करताना बरीच मदत झाली. परिस्थितीशी अनुकूल असे तांत्रिक बदल करण्यास मी तयार असून, फलंदाजीला नव्या तंत्राची जोड देण्यास मी सज्ज आहे.’

टॅग्स :शाहरुख खानचेतेश्वर पुजाराभारतीय क्रिकेट संघ
Open in App