Join us  

Peshawar Attack: "देशातील लोकांच्या वेदना पाहून हृदय रडतं...", मशिदीतील बॉम्बस्फोटानंतर पाक खेळाडू भावूक

peshawar masjid attack: पाकिस्तानमधील पेशावर येथील मशिदीत नमाज पडत असताना बॉम्बस्फोट झाल्याचे समोर आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 4:44 PM

Open in App

नवी दिल्ली : पाकिस्तानमधील पेशावर येथील मशिदीत नमाज पडत असताना बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली. नमाज सुरू होताच एका व्यक्तीने स्वत:ला बॉम्बने उडवून घेतले. या घटनेत 90 हून अधिक जण जखमी झाले असून 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या बॉम्बस्फोटात अनेकजण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना पेशावर पोलीस लाईन जवळ घडली आहे. या बॉम्बस्फोटात मशिदीची भींत पडली असून  घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बॉम्बस्फोटानंतर परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. 

दरम्यान, पाकिस्तानमध्ये वारंवार होत असलेल्या अशा प्राणघातक हल्ल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट संघाचे खेळाडू भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. हे सर्वकाही थांबले पाहिजे अशा शब्दांत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने व्यथा मांडली. शाहीनने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "माझ्या देशातील लोकांना वेदना होत असल्याचे पाहून माझे हृदय रडते. सर्व पीडित त्वरीत बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. हे सर्वकाही थांबलेच पाहिजे." तर शोएब मलिकने देखील या घटनेचा निषेध केला आहे. "पेशावर मशिदीत झालेल्या या स्फोटाचा मी तीव्र निषेध करतो. कुटुंबीय आणि तिथल्या प्रभावित लोकांसोबत माझ्या प्रार्थना आहेत. या कठीण काळात आपण एकत्र राहिले पाहिजे", अशा शब्दांत शोएब मलिकने या घटनेवर प्रतिक्रिया दिली. 

बॉम्बस्फोटानंतर मशिदीबाहेर अनेकजण मदतीसाठी याचना करत असल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. स्थनिकांनी लगेचच मदत करण्यास सुरुवात केली. मशिदीमध्ये सर्वजण प्रार्थनेसाठी एकत्र जमल्यानंतर मोठा बॉम्बस्फोट झाला. खरं तर पेशावरच्या मशिदीत स्फोटाची ही पहिली घटना नाही. यापूर्वी मार्च 2022 मध्ये शिया मशिदीत मोठा स्फोट झाला होता, ज्यामध्ये 57 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात किमान 200 लोक जखमीही झाले आहेत. पेशावरमधील किस्सा ख्वानी बाजार येथील जामिया मशीद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध शिया मशिदीत हा स्फोट झाला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :पाकिस्तानशोएब मलिकमृत्यू
Open in App