Join us  

भारताचा सामना करण्याआधीच पाकिस्तानला धक्का; प्रमुख खेळाडू जखमी झाल्याची चर्चा

Asia Cup 2023 Live Marathi : पाकिस्तानने आशिया चषक २०२३ स्पर्धेत दणक्यात सुरुवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 5:27 PM

Open in App

Asia Cup 2023 Live Marathi : पाकिस्तानने आशिया चषक २०२३ स्पर्धेत दणक्यात सुरुवात केली. ३४२ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर नेपाळचा संपूर्ण संघ १०४ धावांत तंबूत पाठवला आणि बाबर आजमच्या संघाने २३८ धावांनी सामना जिंकला. आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तानचा हा सर्वात मोठा विक्रम ठरला. बाबर आजम ( Babar Azam) व इफ्तिखार अहमद यांच्या शतकांनंतर शादाब खान, शाहिन आफ्रिदी व हॅरिस रौप यांनी दुबळ्या नेपाळची शिकार केली. आता भारताचा सामना करण्यासाठी पाकिस्तानचा संघ कोलम्बो येथे दाखल झाला आहे आणि २ सप्टेंबरला India vs Pakistan असा महामुकाबला होणार आहे. पण, त्याआधीच त्यांच्या प्रमुख खेळाडूला दुखापत सतावत असल्याचे चित्र पाहायला मिळतेय.

बाबर आजम आणि इफ्तिखार अहमद यांनी पाचव्या विकेटसाठी २१४ धावांची भागीदारी करून अनेक विक्रम मोडले. रिझवान ( ४४) सोबत चांगली भागीदारी करणाऱ्या बाबरने १३१ चेंडूंत १४ चौकार व २ षटकारांसह १५१ धावा केल्या. इफ्तिखार ७१ चेंडूंत ११ चौकार व ४ षटकारांसह १०९ धावांवर नाबाद राहिला अन् पाकिस्तानने ६ बाद ३४२ धावा चोपल्या.  शाहिन शाह आफ्रिदीने ( २-२७) पहिल्या षटकात दोन धक्के दिल्यानंतर, हॅरिस रौफ ( २-१६) व शादाब खान ( ६.४-०-२७-४) यांनी पुढील सूत्रं हाती घेतली आणि मॅच जिंकून दिली.  सोमपाल कामी ( २८) व आरिफ शेख ( २६) यांचा अपवाद वगळता नेपाळचे फलंदाज अपयशी ठरले.  

नेपाळविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीने पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेतल्या. पण, ५ षटकं टाकल्यानंतर त्याला गुडघ्याची दुखापत सतावत असल्याचे दिसले. फिजिओ आणि डॉक्टर त्याच्याकडे धावले... काही वेळ चर्चा करून त्यांनी शाहिनला मैदान सोडायला लावले. बऱ्याच वेळानंतर शाहिन पुन्हा मैदानावर आला, परंतु त्याने गोलंदाजी केली नाही. त्याने त्या सामन्यात ५-०-२७-२ अशी स्पेल टाकली. शाहिनला वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान ही दुखापत झाली होती आणि तो बराच काळ मैदानापासून दूर होता. आता त्याच्या दुखापतीनं पुन्हा डोकं वर काढल्याने पाकिस्तानी चाहत्यांची चिंता वाढली आहे. 

टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App