नवी दिल्ली : आशिया चषक २०२२ (Asia Cup 2022) ची स्पर्धा तोंडावरच असताना पाकिस्तानच्या संघाला शुक्रवारी मोठा झटका बसला. संघातील प्रमुख गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी त्याच्या दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर झाला आहे. २७ ऑगस्टला आशिया चषक सुरू होणार अन् २० ऑगस्टला त्यांना मोठा धक्का बसला. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे कंबरडे मोडणारा खेळाडूच आता दुखापतीमुळे ६ महिन्यांसाठी मैदानाबाहेर गेला आहे. बाबर आजमच्या नेतृत्वाखाली आशिया चषक जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानला हा मोठा धक्का आहे. दरम्यान, आफ्रिदीच्या जागेवर पाकिस्तानच्या संघात कोणाला स्थान मिळणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.
माहितीनुसार, पाकिस्तानच्या संघात वेगवान गोलंदाज हसन अलीचा (Hasan Ali) समावेश होण्याची दाट शक्यता आहे. मागील वर्षी पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात त्याला प्रभावशाली गोलंदाजी करण्यात अपयश आले होते. मात्र एक घातक गोलंदाज म्हणून त्याची सर्वत्र ख्याती आहे. टी-२० विश्वचषकातील खराब प्रदर्शनामुळेच त्याला आशिया चषकाच्या संघातून वगळण्यात आले होते. मात्र आता आफ्रिदीची कमी भरून काढण्यासाठी त्याचा संघात समावेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आफ्रिदीने वाढवली पाकिस्तानची डोकेदुखी
भारत-पाकिस्तान यांच्यात आशिया चषक स्पर्धेत एकूण १४ सामने झाले आणि त्यात जय-पराजयाची आकडेवारी ही ८-५ अशी भारताच्या बाजूने आहे. पण, २८ ऑगस्टला भारताचा सामना करण्यापूर्वीच पाकिस्तानचे मनोबल खचले आहे. प्रमुख गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीने ( Shaheen Shah Afridi) आगामी आशिया चषक व इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून माघार घेतली आहे. वैद्यकिय टीमने त्याला ४ ते ६ आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तो ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
मी लवकरच परत येईन - आफ्रिदी
शाहीन आफ्रिदीने आशिया चषक स्पर्धेत न खेळण्यावरून प्रतिक्रिया दिली आहे. त्याने आशिया चषकासाठी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. वेगवान गोलंदाज आफ्रिदीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, "आमच्या प्लेइंग ११ मधील प्रत्येक खेळाडू सामना विजेता आहे. आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी माझ्या संघाला शुभेच्छा. चाहत्यांकडून मला लवकर बरे होण्यासाठी तुमच्या प्रार्थना हव्या आहेत. मी लवकरच परत येईन", एकूणच आफ्रिदीने पाकिस्तानी संघ मजबूत असल्याचे स्पष्ट केले आहे. आशिया चषकात २८ ऑगस्ट रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमने सामने असणार आहेत.
आशिया चषकासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हूड्डा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ -
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर.
Web Title: shaheen Afridi injury could open door for Hasan Ali to return in pakistan team for asia cup 2022
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.