भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याने पहिल्या वन डे सामन्यात इंग्लंडची दाणादाण उडवली. जसप्रीतने १९ धावांत ६ विकेट्स घेताना इंग्लंडमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची नोंद करत अनेक विक्रम मोडले. जसप्रीतची ही कामगिरीपाहून इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसैन याने समालोचन करताना जसप्रीत हा सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील बेस्ट गोलंदाज असल्याचा दावा केला. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर यालाही सामन्यातनंतर याबाबत विचारण्यात आले, परंतु त्याने वरवरचे उत्तर दिले.
जसप्रीत बुमराहला सर्वोत्तम गोलंदाज म्हटलेलं पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट याला फार आवडलं नाही आणि त्यानं जसप्रीतला टक्कर देणारा गोलंदाज आमच्याकडे असल्याचा दावा केला. बटने डावखुरा जलदगती गोलंदाज शाहिन आफ्रिदी याच्या कौतुकाचा पाढा वाचला. तो म्हणाला,''शाहिन भरपूर क्रिकेट खेळलेला नाही, परंतु तो सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. तो जसप्रीत बुमराहपेक्षा कमी नाही. खरं सांगायचं अत अुभवानंतर तो आणखी चांगला गोलंदाज बनेल. त्याच्या गोलंदाजीचा वेग वाढलेला असेल अन् तो आणखी वेगळ्या शैलीने चेंडू टाकेल. दोन्ही खेळाडू हे जगातील चांगले गोलंदाज आहेत आणि त्यांचा खेळ पाहताना सर्वांना आनंद होतो.''
२०१६ मध्ये जसप्रीत बुमराह पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि त्यानंतर दोन वर्षांनी त्याने कसोटीत पदार्पण केले. कसोटीत त्याने अनेक विक्रमही मोडले आहेत. या सहा वर्षात जसप्रीतने १५९ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ३१६ विकेट्स घेतल्या आहेत. शाहिनने २०१८मध्ये पदार्पण केले आणि ९६ आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याने २०४ विकेट्स घेतल्या आहेत. ''२० वर्षीय गोलंदाज ज्या प्रकारे कामगिरी करतोय ती गोष्ट सोपी नाही. बुमराहने अधिक सामने खेळले आहेत आणि त्याची कामगिरीही दमदार सुरू आहे. या दोघांमध्ये तुलना होऊ शकत नाही. एक जास्त क्रिकेट खेळलाय, दुसरा नाही,''असेही बट म्हणाला.