AUS vs PAK | कॅनबेरा : पाकिस्तानी संघ ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर कसोटी मालिका खेळणार आहे. आगामी मालिकेसाठी शेजाऱ्यांचा संघ काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात दाखल झाला. कांगारूंच्या धरतीवर उतरताच पाकिस्तानी खेळाडू कुली बनल्याचे पाहायला मिळाले. त्यावरून शेजाऱ्यांना ट्रोलही करण्यात आले. मोहम्मद रिझवानसह काही खेळाडूंनी स्वत:चे सामान स्वत: उतरवल्याने पाकिस्तानी संघाची खिल्ली उडवली गेली. मात्र, याबद्दल बोलताना शाहीन शाह आफ्रिदीने वेळेचे बंधन असल्याने आम्ही एकमेकांस साहाय्य केल्याचे सांगितले. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १४ डिसेंबरपासून तीन सामन्यांची मालिका होणार आहे.
दरम्यान, पाकिस्तानी खेळाडूंनी सामानाची वाहतूक केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सिडनी विमानतळावरील हे फोटो पाकिस्तानच्या टीकाकारांना आमंत्रण देत होते. याबद्दल वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने रविवारी भाष्य केले. कॅनबेरा येथे माध्यमांशी बोलताना शाहीनने म्हटले, "पुढचे विमान पकडण्यासाठी आमच्याकडे केवळ ३० मिनिटांचा वेळ होता आणि तिथे आमची मदत करण्यासाठी फक्त दोन जण होते. त्यामुळे आम्हीच त्यांना सहकार्य केले आणि वेळ वाचवण्यासाठी सामानाची वाहतूक केली. आम्ही आमच्या संघाकडे एक कुटुंब म्हणून पाहतो आणि कुटुंबीयांप्रमाणे एकमेकांना मदत केली."
सलामीच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ -पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलंड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबूशेन, नाथन लायन, मिचेल मार्श, लॉन्स मॉरिस, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.
कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानी संघ -शान मसूद (कर्णधार), आमिर जमाल, अब्दुला शफिक, अबरार अहमद, बाबर आझम, फरिम अश्रफ, हसन अली, इमाम-उल-हक, खुर्राम शेहजाद, मीर हमझा, मोहम्मद रिझवान, नौमान अली, मोहम्मद वसिम ज्युनियर, सैय्य अयुब, सलमान अली आघा, सरफराज अहमद, सौद शकील, शाहीन शाह आफ्रिदी.
पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक
- पहिला सामना - १४ ते १८ डिसेंबर (पर्थ स्टेडियम)
- दुसरा सामना - २६ ते ३० डिसेंबर (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)
- तिसरा सामना - ३ ते ७ जानेवारी (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)