नवी दिल्ली : आशिया चषकाचा (Asia Cup 2022) थरार रंगण्यासाठी आता अवघे काही तास उरले असून सर्व संघ यूएईत दाखल झाले आहेत. भारतीय संघ देखील 2 दिवसांपासून यूएईच्या धरतीवर सराव करत आहे. स्पर्धेचे प्रबळ दावेदार आणि कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) रविवारी 28 ऑगस्ट रोजी आमनेसामने असणार आहेत. दोन्हीही संघाचे खेळाडू एकमेकांच्या भेटीगाठी घेत आहेत, त्याचेच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) भारतीय खेळाडू आणि शाहिन आफ्रिदीच्या संवादाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये दिग्गज खेळाडूंचा संवाद स्पष्टपणे ऐकायला मिळत आहे.
दरम्यान, व्हिडीओमध्ये शाहिन आफ्रिदी भारतीय खेळाडूंशी चर्चा करताना पाहायला मिळत आहे. तसेच भारतीय खेळाडू त्याच्या तब्येतीची विचारपूस करत आहेत. यादरम्यान, शाहिन आफ्रिदीने पंतला मजेशीर टिप्पणी केली आहे, ज्याला पंतने देखील जोरदार उत्तर दिले आहे, जे सर्वांचे लक्ष वेधत आहे. शाहिन आफ्रिदी सध्या दुखापतीमुळे ग्रस्त आहे त्यामुळेच तो आशिया चषकातून बाहेर झाला आहे.
आफ्रिदी आणि पंतचा संवाद व्हायरल शाहिन जेव्हा पंतला भेटला तेव्हा त्याच्या पायाला पट्टी बांधलेली होती. यावरून पंतने त्याची विचारपूस केली. तेव्हा शाहिनने म्हटले, "मी पण तुझ्यासारखा फलंदाजी करण्याचा विचार करत आहे, एका हाताने षटकार मारतो." हे ऐकून पंत हसू लागला आणि प्रत्युत्तर देताना मजेशीर अंदाजात म्हणाला, "'वेगवान गोलंदाज असाल तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, सर! अत्यंत महत्त्वाचे आहे."
आशिया चषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हूड्डा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ -बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर.