नवी दिल्ली : शाहीन आफ्रिदीला पाकिस्तानी संघातील सर्वात घातक गोलंदाज म्हणून ओळखले जाते. 22 वर्षीय पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाला 2021 मध्ये ICC पुरूष क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला होता. 2021 च्या ट्वेंटी-20 विश्वचषकात भारताला सुपर-12 मधून बाहेर काढण्यात या खेळाडूची सर्वात मोठी भूमिका होती. रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलसारख्या दिग्गजांना बाद करून शाहीनने भारताच्या टॉप ऑर्डरला अयशस्वी ठरवले होते. पण 2022 मध्ये बहुतांश काळ शाहीन दुखापतीमुळे मैदानापासून दूर राहिला आहे. आशिया चषकानंतर इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत देखील तो खेळू शकला नाही.
दरम्यान, शाहीन आफ्रिदी लवकरच पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीचा जावई होणार आहे. अलीकडेच शाहीनने एका सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली होती, ज्यात त्याने त्याच्या चाहत्यांना संबोधित केले. या दरम्यान, पाकिस्तानी क्रिकेटप्रेमीने त्याला त्याच्या आवडत्या विकेटबद्दल विचारले असता शाहीनने अप्रतिम उत्तर दिले. 22 वर्षीय शाहीन म्हणाला की त्याची आवडती विकेट माजी अष्टपैलू आणि कर्णधार शाहिद आफ्रिदीची होती, जो त्याचा सासरा देखील होणार आहे. "मी एकदा माझ्या सासऱ्यांना बाद केले होते", असे शाहीनने म्हटले.
शाहीन होणार शाहिद आफ्रिदीचा जावई शाहिद आफ्रिदीला बाद केल्यावर त्याच्या भावनांबद्दल शाहीनला विचारण्यात आले, ज्यावर त्याने उत्तर देताना म्हटले, "चांगली भावना होती. एक आदर्श, आणि आपल्या रोल मॉडेलला बाद करणे ही चांगली भावना असते. प्रत्येकाचे स्वप्न असते की आपल्या आदर्श व्यक्तीला बाद करायचे. ही एक चांगलीच भावना होती." लाहोर कलंदर आणि कराची किंग्ज यांच्यातील पाकिस्तान सुपर लीग सामन्यादरम्यान शाहीनने शाहिद आफ्रिदीला बाद केले होते. हा सामना दुबईत झाला आणि शाहिदने पहिल्या चेंडूवर शाहीनला षटकार ठोकला, पण पुढच्याच चेंडूवर डावखुऱ्याने शाहिदचा त्रिफळा उडवला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"