shaheen afridi, PAK vs NZ । नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू शोएब अख्तर त्याच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. अलीकडेच त्याने पाकिस्तानी संघाचा विद्यमान कर्णधार बाबर आझमची इंग्रजीवरून खिल्ली उडवली होती. शोएब अख्तरने बाबर आझमने त्याच्या बोलण्याच्या कौशल्यावर काम न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसेच बाबर हा देशातील सर्वात मोठा ब्रँड बनू शकतो, असे त्याला वाटते, मात्र इंग्रजी येत नसल्याने तो मागे राहिला असल्याचे अख्तरने सांगितले होते.
पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शाहीन आफ्रिदीला विचारण्यात आले की, शोएब अख्तरमध्ये कोणता असा गुण आहे, ज्याचे तू सतत कौतुक करतोस. या प्रश्नांचे उत्तर देताना शाहिदी आफ्रिदीच्या जावयाने म्हटले, "ब्रँड हा फक्त चांगल्या गोष्टींचा बनत असतो." आफ्रिदीच्या या विधानाला अख्तरच्या विधानाशी जोडले जात आहे. खरं तर अख्तरने काही दिवसांपूर्वी बाबर आझमला इंग्रजी बोलण्यावरून लक्ष्य केले होते. तर शाहीन आफ्रिदीच्या ट्वेंटी-२० विश्वचषकातील दुखापतीवर देखील त्याने भाष्य करून सर्वांचे लक्ष वेधले होते.
पाकिस्तानची २-० ने आघाडी दरम्यान, पाकिस्तानी संघ सध्या मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. मालिकेतील सुरूवातीचे दोन सामने जिंकून यजमान संघाने २-० ने आघाडी घेतली आहे. किवी संघातील काही वरिष्ठ खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त असल्याने युवा खेळाडूंना पाकिस्तानविरूद्धच्या मालिकेसाठी संधी मिळाली आहे. पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने दुसऱ्या सामन्यात शतक ठोकून पाहुण्या संघाचा दारूण पराभव केला.
न्यूझीलंड विरूद्ध पाकिस्तानचे सामने -
- १४ एप्रिल - पहिला ट्वेंटी-२० सामना, लाहोर
- १५ एप्रिल - दुसरा ट्वेंटी-२० सामना, लाहोर
- १७ एप्रिल - तिसरा ट्वेंटी-२० सामना, लाहोर
- २० एप्रिल - चौथा ट्वेंटी-२० सामना, रावळपिंडी
- २४ एप्रिल - पाचवा ट्वेंटी-२० सामना, रावळपिंडी
- २६ एप्रिल - पहिला वन डे सामना, रावळपिंडी
- ३० एप्रिल - दुसरा वन डे सामना, कराची
- ३ मे - तिसरा वन डे सामना, कराची
- ५ मे - चौथा वन डे सामना, कराची
- ७ मे - पाचवा वन डे सामना, कराची
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"