नवी दिल्ली : सध्या आशिया चषकाचा (Asia Cup 2022) थरार रंगला आहे. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या 4 संघांनी सुपर-4 मध्ये प्रवेश मिळवला आहे. आज भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये सामना होणार असून विजेता संघ किताबाकडे एक पाऊल झेप घेईल. तर पराभूत संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता आहे. कारण 4 संघांमधील क्रमवारीत अव्वल 2 स्थानावर राहणाऱ्या संघांमध्ये 11 सप्टेंबर रोजी फायनलचा सामना खेळवला जाईल. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये सुपर-4 मधील चौथा सामना बुधवारी पार पडेल.
दरम्यान, चारही संघ प्रत्येकी 2-2 सामने जिंकून इथपर्यंत आले आहेत. पाकिस्तानच्या संघाला आपल्या पहिल्या सामन्यात भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर दोन्ही सामन्यात विजय मिळवून पाकिस्तानने सुपर-4 मध्ये प्रवेश केला. रविवारच्या सामन्यात भारताला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानी संघाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. अशातच पाकिस्तानी गोलंदाजांचा एक संवाद खूप व्हायरल होत आहे, जो पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) ट्विटरवरून शेअर केला आहे. यामध्ये दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर असलेला शाहिन आफ्रिदी, हारिस रौफ आणि नसीम शाह यांचा समावेश आहे.
आशिया कप जाता कामा नये - आफ्रिदी व्हिडीओमध्ये शाहिन आफ्रिदी युवा गोलंदाजांना मार्गदर्शन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. "सध्या मी फिट असून विश्रांती घेत आहे त्यामुळे कदाचित 2 आठवड्यांनंतर गोलंदाजी करू शकेन. तुम्ही लांब असला तरी सहवासाने जवळ आहात. अखेरच्या षटकांमध्ये यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करा. न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेत आपण भेटू पण सध्या आशिया कप हातातून जाता कामा नये", अशा शब्दांत आफ्रिदीने लवकरच गोलंदाजी करणार असल्याचे संकेत दिले आहेत.
आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ -बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, हसन अली, नसीम शाह, मोहम्मद हसनैन, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर.