Shaheen Shah Afridi Pakistan vs Australia : पाकिस्तानच्या संघाला पहिल्या दोन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध पराभव स्वीकारावा लागला. तीन सामन्यांच्या मालिकेत यजमान ऑस्ट्रेलिया २-० अशी अजिंक्य आघाडी घेऊन आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या संघाला लाज राखण्यासाठी व्हाईटवॉश टाळण्याच्या दृष्टीने शेवटची कसोटी जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पाकिस्तानने शेवटच्या कसोटी सर्वोत्तम ११ खेळाडूंना संधी देणे अपेक्षित होते. मात्र नवा कर्णधार शान मसूद याने एक अजब निर्णय घेत, मॅचविनर गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी यालाच संघाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ आणि मेलबर्नमध्ये झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये पराभव झाल्यानंतर पाकिस्तानला शेवटचा सामना सिडनीमध्ये खेळायचा आहे. ३ जानेवारीपासून हा सामना सुरू होणार असून या सामन्यापूर्वीच पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने शाहीन आफ्रिदीला पाकिस्तानी संघातून वगळून टाकले आहे. सामन्याच्या एक दिवस आधी पाकिस्तानने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल केले. ज्यामध्ये इमाम उल हक आणि शाहीन आफ्रिदीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
पाकिस्तानने शाहीन आफ्रिदी आणि इमाम उल हक यांना प्लेइंग इलेव्हनमधून का वगळले हा मोठा प्रश्न आहे. खराब फॉर्ममुळे इमाम उल हकला संघात स्थान मिळालेले नाही, तर शाहीन आफ्रिदीला विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे. शान मसूदने सांगितले की, शाहीन आफ्रिदीने गेल्या एका वर्षात सर्वाधिक षटके टाकली आहेत आणि आता त्याला विश्रांतीची गरज आहे. इमाम उल हक यालाही संघातून बाहेर करण्यात आले आहे.
दरम्यान, २०२२ साली शाहीनने वर्षभरात ४ कसोटी खेळून १३ बळी टिपले तर २०२३ मध्ये ४ कसोटी सामन्यात एकूण १४ बळी टिपले. गेल्या दोन वर्षांत त्याची कामगिरी फारशी चांगली न झाल्यानेच त्याला संघातून वगळल्याची चर्चा आहे.