Join us  

शाहीन शाह आफ्रिदीनं किंग कोहलीसंदर्भात केलं 'विराट' वक्तव्य, आयुष्यात...

 बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी मैदानात उतरण्याआधी शाहीन आफ्रिदीनं  किंग कोहलीसंदर्भात एक मोठ वक्तव्य केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 12:58 PM

Open in App

 बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी मैदानात उतरण्याआधी शाहीन आफ्रिदीनं  किंग कोहलीसंदर्भात एक मोठ वक्तव्य केले आहे. भारतीय स्टार फलंदाजावर कौतुकाचा वर्षाव करताना त्याने विराट कोहलीची मनाला भावलेल्या इनिंगवरही भाष्य केले. टी २० वर्ल्ड कप २०२२ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायहोल्टेज सामना पाहायला मिळाला होता. या सामन्यातील कोहलीची इनिंग जबरदस्त होती, असे शाहीन शाह आफ्रिदीनं म्हटले आहे.

किंग कोहलीची ती विराट खेळी शाहीन शाह आफ्रिदीच्या मनात भरलीये   

स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये पाकिस्तानी जलदगती गोलंदाजानं विराट कोहलीची मनात भरलेल्या इनिंगवर बोलंदाजी केली. तो म्हणाला की, विराट कोहलीची नाबाद ८२ धावांची खेळी मला सर्वोत्तम वाटते. मी माझ्या कारकिर्दीत यापेक्षा चांगली खेळी पाहिलेली नाही. विराट कोहली हा महान खेळआडू आहे. त्याच्यासारख्या खेळाडूच अशी अप्रतिम खेळी करू शकतो. हॅरिस राउफच्या गोलंदाजीवरील षटकाराचाही उल्लेख शाहीन शाह आफ्रिदीनं केला. हॅरिसचा तो चेंडू सर्वोत्तम होता. त्या चेंडूवर सरळ षटकार मारणं अविश्वसनीय होते.  

कोहलीनं या सुरेख इनिंगसह पाकच्या तोंडचा घास घेतला होता हिरावून

शाहीन शाह आफ्रिदीनं विराट कोहलीच्या ज्या इनिंगचा उल्लेख केला ती इनिंग टी-२० वर्ल्ड कप २०२२ स्पर्धेत पाहायला मिळाली होती.  ऑस्ट्रेलियातील एमसीजी क्रिकेट ग्राउंडवर रंगलेल्या सामन्यात विराट कोहलीच्या खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करून दाखवला होता. हा सामना भारताच्या हातून निसटला होता. पण विराट कोहलीनं पाकिस्तानच्या तोंडचा घास हिरावून घेत टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता.  

धावांचा पाठलाग करताना अनेकदा पराक्रम केला, पण पाकिस्तान विरुद्धची ती खेळी एकदमच खास

पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्यात विराट कोहलीनं ५३ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १५४.७२ च्या स्ट्राइक रेटसह नाबाद ८२ धावांची खेळी केली होती.  धावांचा पाठलाग करताना कोहलीच्या भात्यातून अनेकदा अशा अफलातून इनिंग्स पाहायला मिळाल्या आहेत. पण किंग कोहलीलाही पाकिस्तान विरुद्धची हीच खेळी, सर्वोत्तम वाटते.