नवी दिल्ली : आशिया चषक २०२२ (Asia Cup 2022) ची स्पर्धा तोंडावरच असताना पाकिस्तानच्या संघाला शुक्रवारी मोठा झटका बसला. संघातील प्रमुख गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी त्याच्या दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर झाला आहे. २७ ऑगस्टला आशिया चषक सुरू होणार अन् २० ऑगस्टला त्यांना मोठा धक्का बसला. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे कंबरडे मोडणारा खेळाडूच आता दुखापतीमुळे ६ महिन्यांसाठी मैदानाबाहेर गेला आहे. त्यामुळे भारतीय संघातील टॉप ऑर्डरला दिलासा मिळाला असल्याचे पाकिस्तानचे खेळाडू म्हणत आहेत. आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी २८ ऑगस्ट रोजी आमनेसामने असणार आहेत.
दरम्यान, पाकिस्तानचा माजी खेळाडू वकार युनिसने (Waqar Younis) ट्विटच्या माध्यमातून भारतीय संघावर निशाणा साधला आहे. त्याने ट्विटमध्ये म्हटले, "शाहिन आफ्रिदीची दुखापत म्हणजे भारतीय संघातील टॉप ऑर्डर फलंदाजांना मोठा दिलासा आहे. आम्ही त्याला आशिया चषकात पाहू शकत नाही ही खेदाची गोष्ट आहे." एकूणच वकार युनिसने रोहित आणि विराट यांच्यावर निशाणा साधला आहे. शाहिन आफ्रिदी भारतीय संघातील प्रमुख फलंदाजांना तंबूत पाठवू शकतो असा त्याचा समज आहे.
हसन अलीचा होणार समावेश? माहितीनुसार, पाकिस्तानच्या संघात वेगवान गोलंदाज हसन अलीचा (Hasan Ali) समावेश होण्याची दाट शक्यता आहे. मागील वर्षी पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात त्याला प्रभावशाली गोलंदाजी करण्यात अपयश आले होते. मात्र एक घातक गोलंदाज म्हणून त्याची सर्वत्र ख्याती आहे. टी-२० विश्वचषकातील खराब प्रदर्शनामुळेच त्याला आशिया चषकाच्या संघातून वगळण्यात आले होते. मात्र आता आफ्रिदीची कमी भरून काढण्यासाठी त्याचा संघात समावेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आफ्रिदीने वाढवली पाकिस्तानची डोकेदुखी भारत-पाकिस्तान यांच्यात आशिया चषक स्पर्धेत एकूण १४ सामने झाले आणि त्यात जय-पराजयाची आकडेवारी ही ८-५ अशी भारताच्या बाजूने आहे. पण, २८ ऑगस्टला भारताचा सामना करण्यापूर्वीच पाकिस्तानचे मनोबल खचले आहे. प्रमुख गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीने ( Shaheen Shah Afridi) आगामी आशिया चषक व इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून माघार घेतली आहे. वैद्यकिय टीमने त्याला ४ ते ६ आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तो ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
आशिया चषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हूड्डा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ -बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर.