नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या संघाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगने टी-२० वर्ल्डकप २०२२ च्या फायनलमध्ये (T20 World Cup 2022 Final)कोणते संघ असतील याबाबत भविष्यवाणी केली होती. २०२२ च्या टी-२० वर्ल्डकप फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान हे संघ असतील असे पॉटिंगने म्हटले होते. दरम्यान, पॉटिंगच्या भविष्यवाणी नंतर आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने देखील टी-२० वर्ल्डकपबद्दल भविष्यवाणी केली आहे. फायनलमध्ये भारत नसून पाकिस्तानचा संघ जाईल असा दावा आफ्रिदीने केला आहे.
शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानमधील वृत्तवाहिनीशी बोलताना त्याचे मत मांडले. त्याच्या म्हणण्यानुसार यंदाच्या टी-२० वर्ल्डकपची फायनल पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये होईल. मात्र वर्ल्डकपचा चॅम्पियन कोण होईल याबाबत बोलणे त्याने टाळले आहे. पण पाकिस्तानचा संघ नक्कीच फायनलमध्ये स्थान मिळवेल असा विश्वास त्याने यावेळी व्यक्त केला.
कोहलीची केली होती पाठराखणयाआधी शाहिद आफ्रिदीने कोहलीच्या खराब फॉर्मबाबत भाष्य करून त्याची पाठराखण केली होती. विराट कोहलीचा केवळ फॉर्म खराब असून त्याच्यामध्ये विक्रम करण्याची क्षमता असल्याचे आफ्रिदीने म्हटले होते. आगामी काळात कोहलीला धावा कराव्याच लागणार आहेत. त्याच्याकडून सर्वांना चांगल्या खेळीची अपेक्षा आहे, तो पुन्हा एकदा अव्वल स्थानाकडे कूच करेल असे आफ्रिदीने मत मांडले होते.
दरम्यान, विराट कोहली मागील मोठ्या कालावधीपासून अत्यंत वाईट फॉर्मचा सामना करत आहे. त्याने शेवटच्या वेळी ३ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावले होते. त्यामुळे कोहलीला विविध स्तरातील लोकांच्या टीका टिप्पणीचा सामना करावा लागत आहे. अनेक दिग्गजांनी कोहलीची पाठराखण केली होती तर कपिल देव यांसारख्या दिग्गजांनी कोहलीला विश्रांती द्यायला हवी असे म्हटले होते.