बर्न - स्वित्झर्लंडमधील आल्प्स पर्वतरांगाच्या कुशीत आयोजित करण्यात आलेल्या Ice Cricket 2018 च्या दुस-या सामन्यात शाहिद अफ्रिदीच्या रॉयल्स इलेव्हनने विरेंद्र सेहवागच्या डायमंड्स इलेव्हनचा आठ गडी राखून पराभव केला. यासोबतच अफ्रिदीच्या संघाने स्पर्धेत 2-0 ची विजयी आघाडी मिळवली आहे. याआधी झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात शाहिद अफ्रिदीच्या संघाने सेहवागच्या संघाचा सहा गडी राखून पराभव केला होता.
विरेंद्र सेहवागच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये पाच गडी गमावत 205 धावा केल्या होत्या. सेहवागने 48, कैफने 57 आणि सायमंड्सने 67 धावांची खेळी केली. मात्र अफ्रिदीच्या संघाने फक्त 16 ओव्हर्समध्येच दोन गडी गमावत सामना जिंकला. जॅक कॅलिसने फक्त 37 चेंडूत 90 धावा ठोकल्या.
या सामन्यानंतर शाहिद अफ्रिदी मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. झालं असं होतं की, सामना संपल्यानंतर शाहिद अफ्रिदीने भारतीय चाहत्यांसोबत फोटो काढून घेतला. यावेळी एका तरुणीसोबत फोटो काढत असताना शाहिद अफ्रिदीने तिच्या हातात तिरंगा असल्याचं पाहिलं, आणि त्याने तो पुर्ण उघडण्यास सांगितलं. नंतर शाहिदने तिरंग्यासोबत फोटो काढला. शाहिद अफ्रिदीच्या या वागण्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
गुरुवारीदेखील भारत आणि पाकिस्तान या क्रिकेटमधील पारंपारिक द्वंद्वाचा थरार अनुभवायला मिळाला. यावेळी भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि पाकिस्तानचा धडाकेबाज खेळाडू शाहीद आफ्रिदी यांचे संघ एकमेकांना भिडले. सेहवाग आणि आफ्रिदी यांच्यामुळे या सामन्याला वेगळीच रंगत आली होती. सेहवागने या सामन्यात आपल्या लौकिकाला जागत स्फोटक फलंदाजी केली तरी त्याचा संघ आफ्रिदीच्या संघाकडून पराभूत झाला. सेहवागच्या पॅलेस डायमंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 9 बाद 164 धावा केल्या. यामध्ये सेहवागने 31 चेंडूत सर्वाधिक 62 धावा फटकावल्या. मात्र, आफ्रिदीच्या संघातील ओवेस शहाने सेहवागच्या तोडीस तोड फलंदाजी करत 74 धावा केल्याने आफ्रिदीच्या रॉयल संघाने हा सामना 6 गडी राखून जिंकला.