गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान क्रिकेट संघाचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचा निकाह होणार असल्याची अफवा पसरली होती. पण आता या अफवांना पूर्णविराम देत शाहीन शाह आफ्रिदीचा साखरपुडा होणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या (shahid afridi) थोरल्या मुलीसोबत शाहीन आफ्रिदीच्या (Shaheen Shah) रेशीमगाठी जुळून आल्या आहेत.
शाहिनच्या कुटुंबीयांनी देखील या वृत्ताची पुष्टी केली आहे. मात्र, साखरपुड्याची नेमकी तारीख अद्याप कळू शकलेली नाही. "शाहिन आणि शाहिद आफ्रिदीची थोरली मुलगी अक्सा आफ्रिदी यांचा साखरपुडा निश्चित झाला आहे. दोन्ही कुटुंबीयांनी गेल्या अनेक वर्षांपासूनच्या ओळखीचं रुपांतर आता नातेसंबंधांत बदलण्याचं ठरवलं आहे", असं शाहीनचे वडील अयाज खान म्हणाले.
पाकिस्तानी पत्रकार इहतिशम उल हक यानेही ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे. "दोन्ही कुटुंबांच्या परवानगीनंतर मी सर्वांना सांगू इच्छितो की, खरोखरच शाहीन आणि अक्सा यांचा साखरपुडा होणार आहे. दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नासाठी संमती दिली आहे. अक्साचे शिक्षण २ वर्षात पूर्ण होईल. यादरम्यान त्यांचा साखरपुडा केला जाऊ शकतो", असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.
डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी सध्या २० वर्षांचा असून तो पाकिस्तान संघातील प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. २०१८ साली वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्याने २२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ४५ विकेट्स घेतल्या आहेत. तर २१ टी२० सामन्यात २४ विकेट्स आणि १५ टी२० सामन्यात ४८ विकेट्स घेतल्या आहेत.