क्रिकेटवर्तुळात 'बुम बुम आफ्रिदी' म्हणून ओळखला जाणारा आणि सध्या भारत-पाक संबंधांबाबत अकलेचे तारे तोडून नेटकऱ्यांचे शाब्दिक फटके खाणारा शाहिद आफ्रिदी पुन्हा वादात सापडला आहे. आपल्या आत्मचरित्रात खरी जन्मतारीख सांगून त्यानं, आपण किती सत्यवचनी आहोत, हे दाखवायचा प्रयत्न केला आहे. मात्र, २३ वर्षं तू खोटं का बोलत होतास, वय का लपवत होतास?, असा 'बाउन्सर' नेटिझन्सनी त्याला टाकलाय. आफ्रिदीनं खरं वय सांगितल्यानंतर आता आयसीसी त्याला 'जोर का झटका' देण्याची शक्यता आहे. त्याच्या नावावरील एक विक्रम काढून घेतला जाऊ शकतो.
माझा जन्म १९८० सालचा नव्हे, तर १९७५ चा आहे. श्रीलंकेविरोधात १९९६ मध्ये मी ३७ चेंडूत शतक झळकावलं, तेव्हा मी १६ नव्हे १९ वर्षांचा होता, असं शाहिद आफ्रिदीने 'गेम चेंजर' या आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी आपलं वय चुकीचं लिहिल्याचा दावा त्यानं केलाय. परंतु, इथेही त्याचं गणित चुकलंय. कारण, त्याच्याच म्हणण्याप्रमाणे, त्याचा जन्म १९७५चा असेल, तर १९९६ मध्ये त्याचं वय २१ वर्षं असायला हवं. पण मी १९ वर्षांचा होतो असं तो म्हणतोय.
वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक झळकावणाऱ्या वीरांच्या यादीत आफ्रिदी अव्वल क्रमांकावर आहे. त्यानं १६ वर्षं २१७ दिवसांचा असताना शतक साकारल्याची नोंद आहे. पण आता ती चुकीची असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे आफ्रिदीच्या नावावरील विक्रमासंदर्भात आयसीसी काय निर्णय घेते, हे पाहावं लागेल. आफ्रिदीनं इतक्या वर्षांत तोंड का उघडलं नाही, खरं वय का सांगितलं नाही, यावरून नेटकऱ्यांनी त्याला घेरलंय.
२७ कसोटी, ३९८ वनडे आणि ९९ टी-ट्वेन्टी सामने खेळून २०१६ मध्ये आफ्रिदीनं क्रिकेटला अलविदा केला होता. कधी फटकेबाजीमुळे, कधी मैदानावरील राड्यामुळे, तर कधी रडेपणामुळे तो चर्चेत राहिला. आताही वेगवेगळी विधानं करून चर्चेत राहण्यासाठी तो धडपडत असतो आणि स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत असतो.
सर्वात कमी वयात शतकोत्सव साकारणारे वीर
शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) - १६ वर्षं २१७ दिवस (वि. श्रीलंका १९९६)
उस्मान गनी (अफगाणिस्तान) - १७ वर्षं २४२ दिवस (वि. झिम्बाब्वे २०१४)
इम्रान नझीर (पाकिस्तान) - १८ वर्षं १२१ दिवस (वि. झिम्बाब्वे २०००)
सलीम इलाही (पाकिस्तान) - १८ वर्षं ३१२ दिवस (वि. श्रीलंका १९९५)
तमीम इक्बाल (बांगलादेश) - १९ वर्षं २ दिवस (वि. आयर्लंड २००८)