Join us

"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

शाहिद आफ्रिदी त्याच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 18:03 IST

Open in App

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी त्याच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. केवळ आयसीसी आणि आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचे सामने होत असतात. यावरून तो सातत्याने भारत सरकार आणि बीसीसीआयला लक्ष्य करत असतो. आता पुन्हा एकदा त्याने हाच पवित्रा घेत अप्रत्यक्षपणे भारत सरकारवर टीकास्त्र सोडले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी क्रिकेट हा एकमेव उपाय असल्याचे आफ्रिदीने सांगितले. खरे तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटच्या वेळी २०१२ मध्ये द्विपक्षीय मालिका झाली होती. 

भारत आणि पाकिस्तान आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकात ९ जून रोजी आमनेसामने असणार आहे. आफ्रिदीने माध्यमांशी बोलताना सांगितले की, लोकांना एकत्र आणण्याचा क्रिकेट हा मोठा स्त्रोत आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील कटुता मिटवण्यासाठी खेळात सुधारणा करणे गरजेचे आहे. अनेकदा आम्हाला धमकी आली तरी आम्ही भारत दौरा केला. भारतात या आधी देखील भाजप सरकार होते. पण, तेव्हा सर्वकाही ठीक होते. आता एका व्यक्तीमुळे अनेक बदल झाला आहे. 

अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान असताना आम्ही भारत दौऱ्यावर गेलो होतो. तेव्हा देखील भारतीय जनता पक्षाचे सरकार होते. मात्र आता चेहरा बदलला आहे त्यामुळे काही सांगता येत नाही. भारत सरकारने सुरक्षेची हमी दिल्यानंतर आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवत भारत दौरा केला आहे. मला एवढेच वाटते की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट व्हायला हवे.

दरम्यान, टीम इंडिया पाच जूनपासून आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकात आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारताचा पहिला सामना आयर्लंडशी होणार आहे. यानंतर ९ जून रोजी पाकिस्तानविरुद्ध सामना रंगणार आहे. भारतीय संघ १२ जूनला अमेरिकेविरुद्ध सामना खेळणार आहे.

टॅग्स :पाकिस्तानशाहिद अफ्रिदीभारत विरुद्ध पाकिस्तानभाजपा