Pakistan T20 World cup 2024 : ट्वेंटी-२० विश्वचषकात पुन्हा एकदा पाकिस्तानला भारताकडून पराभव पत्करावा लागला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात टीम इंडियाने सहा धावांनी बाजी मारली. भारताकडून जसप्रीत बुमराहने अप्रतिम कामगिरी करताना तीन बळी घेतले. भारतीय संघाने पाकिस्तानच्या तोंडचा घास पळवल्याने पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी चांगलाच संतापला. आफ्रिदीने पाकिस्तानी संघातील काही खेळाडूंसह पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला इशारा दिला आहे.
खरे तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी यांच्यात सर्वकाही ठीक नसल्याची चर्चा आहे. अनेकांनी दावा केला की हे दोघे एकमेकांशी बोलत नाहीत. अशातच शाहिद आफ्रिदीने एक मोठे विधान करताना ट्वेंटी-२० विश्वचषकानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला बर्बाद करणाऱ्यांची नावं उघड करणार असल्याचे म्हटले आहे.
शाहिद आफ्रिदी संतापलाशाहिद आफ्रिदी म्हणाला की, मला खूप साऱ्या गोष्टी माहिती आहेत. पण, मी जाहीरपणे भाष्य करू शकत नाही. मी विश्वचषक संपताच याबद्दल बोलेन. आपल्याच लोकांनी संघामधील एकता मोडीत काढली आहे. जर मी काय बोललो तर लोकांना वाटेल की मी माझ्या जावयाची बाजू घेत आहे. पण असे काही नाही. जर माझी मुलगी किंवा जावई चुकीचा असेल तर मी त्यांना चुकीचेच म्हणेन. आफ्रिदी पाकिस्तानातील 'जिओ न्यूज'वर बोलत होता.
पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव पाकिस्तानचा पराभव करताच भारताने या स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. तर पाकिस्तानला या पराभवासह सलग दुसऱ्यांदा हार पत्करावी लागली. त्यांना सलामीच्या सामन्यात यजमान अमेरिकेने पराभवाची धूळ चारली होती. भारतीय संघाने आयर्लंडला नमवून विजयी सलामी दिली. त्यामुळे पाकिस्तानला सुपर ८ मध्ये पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागेल. किंबहुना शेजाऱ्यांना इतरही संघांवर अवलंबून राहावे लागणार आहे.