Join us  

शाहिद आफ्रिदी का म्हणतोय? थँक्यू विराट!

क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा भारत आणि पाकिस्तान संघ खेळत असतो तेव्हा ते एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणूनच खेळत असतात. पण एकदा का मैदानाबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2017 9:23 PM

Open in App

नवी दिल्ली, दि. 1 - क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा भारत आणि पाकिस्तान संघ खेळत असतो तेव्हा ते एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणूनच खेळत असतात. पण एकदा का मैदानाबाहेर पाऊल पडलं की तेव्हा मात्र मैत्रीचे वारे वाहत असतात. असाच काहीसा अनुभव सध्या येताना दिसत आहे. राजकारणापासून ते बॉलिवूडपर्यंत कोणताही विषय निवडला तरी भारत - पाकिस्तानमध्ये काही ना काहीतरी वाद किंवा कटूता असतेच. पण क्रिकेटच्या बाबतीत बोलायचं तर खेळाडू मात्र हा तणाव कमी करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. खेळाडूंमधील या मैत्रीचा प्रत्यय सध्या विराट कोहली आणि शाहिद आफ्रिदी यांच्यातील ट्विटरच्या संभाषणातून दिसून येत आहे.टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीच्या संस्थेसाठी बॅट गिफ्ट दिली. शाहीद आफ्रिदीने ट्विटरवर या बॅटचा फोटो शेअर करत थँक्यू विराट कोहली कोहली असे लिहले आहे. आफ्रिदीच्या या ट्विटला भारतीय कर्णधार विराट कोहलीनेही सकारत्मक उत्तर देत मैत्री घट्ट केली असेच म्हणावे लागेल.विशेष म्हणजे विराट कोहलीने अशा प्रकारे पाकिस्तानी खेळाडूला खास गिफ्ट देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी गेल्यावर्षी जेव्हा ईडन गार्डन्स मैदानावर भारत - पाकिस्तान सामना पार पडला होता. त्यावेळी विराट कोहलीने पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद आमीरला आपली बॅट गिफ्ट केली होती.

दरम्यान, शाहिद आफ्रिदीने निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियाने कर्णधार विराट कोहलीची जर्सी त्याला भेट दिली होती. इतकंच नाही तर या जर्सीवर टीम इंडियाच्या खेळाडूंची स्वाक्षरी आहे. तुमच्यासोबत खेळणं हा नेहमीच सर्वोत्तम अनुभव होता, असं विराटच्या जर्सीवर लिहिलेलं आहे. या जर्सीवर कोहलीसोबत, युवराज सिंह, आशीष नेहरा, जसप्रीत बुमरा, सुरेश रैना, पवन नेगी, मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, रविचंद्रन अश्विन, हार्दिक पांड्या आणि टीम इंडियाचे माजी संचालक रवी शास्त्री यांची सही आहे. एका पाकिस्तानी पत्रकाराने हा फोटो ट्विटरवर शेअर केला होता.