पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) हा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत राहिला आहे. पण, यावेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शाहिद आफ्रिदीची पाकिस्तान राष्ट्रीय निवड समितीचे अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
यासंदर्भात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विट केले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की, पीसीबी व्यवस्थापन समितीने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची राष्ट्रीय निवड समितीचे अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच, या समितीमध्ये अब्दुल रज्जाक आणि राव इफ्तिखार अंजुम यांचा समावेश आहे. याशिवाय, हारुण रशीद हे संयोजक म्हणून असणार आहेत.
सध्या ही नियुक्ती केवळ न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी पाकिस्तानमधील मालिकेसाठी (New Zealand tour of Pakistan) आहे . याशिवाय समिती हटवण्यापूर्वी मोहम्मद वसीमच्या नेतृत्वाखालील पॅनलकडे इंग्लंडविरुद्ध जाहीर झालेल्या कसोटी संघाचा आढावा घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. संघाने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 3-0 ने गमावली होती. नवीन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या व्यवस्थापन समितीने गुरुवारी पदभार स्वीकारला. तसेच, व्यवस्थापन समितीने शुक्रवारी निवड समितीसह २०१९ च्या घटनेनुसार स्थापन केलेल्या सर्व समित्या विसर्जित केल्या.
दरम्यान, नवीन निवड समिती धाडसी निर्णय घेईल, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नजम सेठी म्हणाले. एका निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शाहिद आफ्रिदी हा एक आक्रमक क्रिकेटर राहिला आहे, जो नेहमीच न घाबरता क्रिकेट खेळला आहे. त्याच्याकडे जवळपास 20 वर्षांचा क्रिकेटचा अनुभव आहे आणि त्याला सर्व फॉरमॅटमध्ये यश मिळाले आहे. विशेष म्हणजे, त्याने तरुणांना नेहमीच मदत केली आहे. त्यामुळे आधुनिक काळातील क्रिकेटची आव्हाने समजून घेण्यासाठी त्याच्यापेक्षा चांगला कोणी व्यक्ती नाही.