Shahid Afridi : ३९८ वन डे सामने, ८०६४ धावा, ६ शतकं व ३९ अर्धशतकांसह ३९५ विकेट्स नावावर असलेला पाकिस्तानचा माजी कर्णधार-अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीला आता वन डे क्रिकेट कंटाळवाणं वाटू लागले आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स ( Ben Stokes) याने वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ५० षटकांच्या क्रिकेटच्या भवितव्यावर अनेक जण भाष्य करू लागले आहेत. सतत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मालिका, फ्रँचायझी लीग यामुळे क्रिकेटपटू थकून जातात. त्यामुळे अनेकांना तीनही फॉरमॅटमध्ये १०० टक्के योगदान देणे जमत नाही. त्यात आता आफ्रिदीने भन्नाट आयडिया दिली आहे.
वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम आफ्रिदीकने १९९६ साली श्रीलंकेविरुद्ध नोंदवला होता. ३७ चेंडूंतील शतकाचा विक्रम हा १७ वर्ष त्याच्याच नाववर राहिला. आफ्रिदीने पाकिस्तानकडून २७ कसोटी, ३९८ वन डे व ९९ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. वन डे क्रिकेटबाबत आफ्रिदी म्हणाला, आता वन डे क्रिकेट कंटाळवाणे झाले आहे. त्यामुळे ते अधिक मनोरंजक बनवण्यासाठी ५० ऐवजी ४० षटकांचा सामना खेळवावा असा मी सल्ला देईन.