पाकिस्तानच्या क्रिकेट संघातील अंतर्गत वाद काही नवीन नाहीत.. सामना सुरू असतानाही अनेकदा खेळाडू एकमेकांना शिव्या देताना दिसली आहेत. त्यात २००७मध्ये रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरनं ( Shoaib Akhtar) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान आपल्याच सहकाऱ्यांवर बॅटीनं हल्ला केला होता. त्याच्या या हल्ल्यात शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) बचावला, परंतु मोहम्द आसिफला ( Mohammad Asif) ला जोरदार फटका बसला अन् तो कोसळला. त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं, याचा खुलासा आफ्रिदीनं केला. अख्तरनं या घटनेला आफ्रिदी जबाबदार असल्याचा दावा त्याचा आत्मचरित्रातून केला होता.
त्यादिवशी नेमकं काय घडलं?२००७मध्ये दक्षिण आफ्रिकेत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळवण्यात आला होता. तेव्हा अख्तरनं आसिफला बॅटने मारले होते आणि या घटनेतील चौकशीनंतर अख्तरला मायदेशात बोलावण्यात आले. अख्तरनं त्याच्या आत्मचरित्रात या घटनेबाबत खुलासा करताना आफ्रिदीवर गंभीर आरोप केले होते. '' आफ्रिदीमुळे माझा पारा चढला अन् मी दोघांवरही बॅट फिरवली. आफ्रिदी खाली वाकला पण आसिफ जागेवरच उभा होता. त्याला माझी बॅट लागली आणि तो खाली पडला'' असा दावा अख्तरनं केला.
आता आफ्रिदीनं काय केला खुलासा?आफ्रिदीनं या प्रकणावरील मौन सोडले. तो म्हणाला,"टीममधील खेळाडू एका कुटुंबासारखेच असतात आणि त्यामुळे ते एकमेकांची थट्टा करतात. पण, काहींना कधीकधी ती सहन होत नाही. तशीच काहीशी घटना तेव्हा घडली आणि तिचा माझ्याशी काडीमात्र संबंध नाही. संतापलेल्या शोएबला पाहून मी मध्यस्थी करण्यासाठी गेलो होतो. एका थट्टेत मी आसिफला साथ दिली होती आणि त्यामुळे शोएब नाराज होता. त्यानंतर हा सर्व प्रकार घडला."