Shahid Afridi on Team India Performance : मागच्या वर्षी युएईत झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानने प्रथमच टीम इंडियाला पराभूत केले. बाबर आजम व मोहम्मद रिझवान या दोघांनीच १५७ धावांचे लक्ष्य सहज पार करून विक्रम रचले. त्यानंतर पाकिस्तानच्या आजी-माजी खेळाडूंकडून भारतीय संघावर बोचरी टीका केली गेली. आताही २०२२च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यात लढत आहे आणि त्यात बाबर आजमचा संघ पुन्हा बाजी मारेल असे दावे पाकिस्तानींकडून केले जात आहेत. माजी अष्टपैलू खेळाडू व कर्णधार शाहिद आफ्रिदी यानेही तसा दावा केला होता आणि दोन दिवसांपूर्वी तर त्याने पाकिस्तानच हा वर्ल्ड कप जिंकेल, असेही म्हटले होते. पण, रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाची इंग्लंडमधील कामगिरी पाहून आफ्रिदीचे मतपरीवर्तन झालेले दिसतेय.
भारतीय संघाने ट्वेंटी-२० मालिकेत इंग्लंडवर दोन्ही सामन्यांत दणदणीत विजय मिळवला. पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने ५० धावांनी बाजी मारली. इंग्लंडविरुद्ध भारताचा हा ट्वेंटी-२०तील मोठा विजय ठरला. काल गोलंदाजांच्या कामगिरीने भारताला ४९ धावांनी विजय मिळवून दिला आणि मालिकेत २-० अशी आघाडीही घेतली. दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात रोहितने रिषभ पंतला ओपनिंगला आणले आणि त्याचा हा डाव सर्वांना आश्चर्यचकित करणारा ठरला. त्यानंतर रवींद्र जडेजाच्या ४६ धावांनी भारताला मजबूत धावसंख्या उभारून दिली. भुवनेश्वर कुमार , जसप्रीत बुमराह व युजवेंद्र चहल यांच्या गोलंदाजीने इंग्लंडचे कंबरडे मोडले.
आफ्रिदीने टीम इंडियाच्या या कामगिरीचे सोशल मीडियावरून कौतुक केले. आफ्रिदीने लिहिले की,''भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि ते या मालिका विजयाचे हकदार आहेत. गोलंदाजांनी प्रभावीत केले. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत जेतेपदाच्या शर्यतीत भारताचा नक्की नंबर आहे. ''